top of page

ती...!!


सुट्टीचा दिवस होता(बाकीच्यांसाठी!). सकाळचं रूपांतर हळूहळू दुपारमध्ये होत आलेलं. आईने, "आंघोळीला जा आता, किती वेळ ती डायरी घेऊन बसून राहणारेस?" हे किमान पाच वेळा तरी ऎकवलेलं. आजीच्या वैतागाचा स्फोट कोणत्याही क्षणी होऊ शकत होता. मधेमधे बहिणीचं काहीतरी सांगणं, दाखवणं, बाबांचं बोलणं, आणि या सगळ्यात, मी माझी स्थितप्रज्ञता ढळू न देता डायरीत डोकं खुपसलेलं!


कारणंच तसं होतं. माझं सगळं लक्षं ’ति’च्या येण्याकडे लागलेलं!


चार-पाच दिवसांपूर्वी आमची पुसटशी भेट झाली. शांताबाई शेळकेंची एक कविता वाचत असताना, ’ति’नं मला खुणावलं. आपल्या आगमनाचा हलका इशारासुद्धा दिला. त्या इशाऱ्याने खुललेली माझी कळी ’ति’च्या स्वागताच्या तयारीला लागली. मी आतुरतेनं वाट पाहू लागले. शांताबाईंच्या त्या कवितेच्या लाडिक शब्दांमध्ये ’ति’ला शोधू लागले, खोलवर दडलेला अर्थ ’ति’च्या येण्याची वर्दी देतोय का, याचा कानोसा घेऊ लागले. क्वचित माझ्या सात साथीदारांच्या मदतीने ’ति’ची मनधरणी करण्याचाही प्रयत्न करू लागले. पण ’ति’ची चाहूलही लागेना.


मी वाट बघायचं, संयमाने वागायचं ठरवलं. बळजबरीने, ’ति’ला धरून पकडून, ओढून मी कधीच आणणार नव्हते. मला ’ती’ स्वमर्जीने यायला हवी होती.


आणि याच विचारात असताना, आंघोळनामक एका य:कश्चित(?) गोष्टीने असं डिस्टर्ब केलेलं मला बिलकुल आवडलं नव्हतं. पण संपूर्ण दिवस ओरडा खात घालवण्यापेक्षा थोडंसं कॉम्प्रमाईज केलेलं बरं, असं म्हणत जड अंत:करणाने डायरी मिटून ठेवली आणि आईच्या आज्ञेचं पालन करायला उठले. काय गंमत असते बघा ना, आपल्या डोक्याला जेव्हा एखाद्या विचाराचा भुंगा असतो, बरोब्बर त्याच वेळेस लोकांना आपल्याला अजून वैचारिक कामं द्यायची हुक्की येते. दुपारी जेवण झाल्यावर म्हटलं आता जरा निवांतपणे शांताबाईंच्या त्या शब्दांशी कानगोष्टी करूया, तर कसलं काय.. मोबाईल वाजला. एका मैत्रिणीचा होता. जरासा नाराजीनेच उचलला. "हाय! अगं आपल्याला एका थीम शोची ऑफर आलीय. मराठी गाणी. उद्यापर्यंत साधारण बजेट, कन्सेप्ट वगैरे कळवायचंय. काल म्हणाली होतीस ना, घरी असणारेस. मी १५ मिनिटांत येते तुझ्याकडे. मग डिस्कस करू."


समजा, तुम्ही एखादी ५०० एमबीची फाईल डाऊनलोड करायला ठेवलीय. ४८० झालेत, २०च राहिलेत आणि लाईट गेले, तर तुमची जी अवस्था होईल, तीच माझीही झाली! पण एका कंपनीच्या ’हर एक फ्रेण्ड जरूरी होता है’ या सांगण्यानुसार ठरवलं ऎकून तर घेऊ काय म्हणत्येय ते आणि मग कटवू. पण जेव्हा ती आली आणि आमचं डिस्कशन(म्हणजे तिचं बोलणं आणि माझं ऎकत्येय असं दाखवणं!) सुरू झालं, तेव्हा लक्षात आलं की आपला ठरवाठरवीचा मनोरा लवकरच कोसळणार आहे.


खरंतर वाऱ्याच्या झुळकीला शांताबाईंनी दिलेल्या झुल्याच्या उपमेवर माझं मन झोके घेत होतं, उंच आभाळात भराऱ्या मारत होतं. आणि दुर्दैवानं बजेटच्या गप्पा ऎकून हवा गेलेल्या फुग्यासारखं खाली येत होतं. मनात रूंजी घालणाऱ्या त्या शब्दांच्या आडून ’ति’ने आपला मुखडा दाखवायला सुरुवात केली होती. पण मैत्रिणीच्या बोलण्याने स्पष्ट दिसत नव्हती. शेवटी दोन तासांनी कसंबसं, वाट्टेल त्या थापा मारून मैत्रिणीला कटवलं एकदाचं! आता मात्र थोडसं बेचैन व्हायला झालं होतं. ’ती’ का सापडत नाहीये अजून? मगाशी मैत्रिणीबरोबर बोलताना लागलेली ’ति’ची चाहूलसुद्धा आता लपली होती कुठेतरी. तेव्हाच थोडा प्रयत्न करता आला असता तर.. मनातल्या मनात त्या मैत्रिणीच्या(आणि पर्यायाने त्या ऑफर देणाऱ्याच्या) नावाने खडे फोडत मी रियाजाला बसले.


सुरांच्या राज्यात फिरताना, मुक्त भ्रमंती करताना माझी बेचैनी बरीच कमी झाली. मग हळूच डायरी उघडली! कवितेच्या त्या शब्दांवरून नजर फिरवताना एका वेगळ्याच दुनियेत पाऊल ठेवल्यासारखं वाटत होतं. ते शब्द हलकेच माझ्या हाताला धरून मला कुठेतरी नेत होते, काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत होते! पण मला नीटसं कळत नव्हतं. मी अतिशय सावध होते, कारण मला हे ठाऊक होतं की याच दुनियेत कुठेतरी मला ’ती’ सापडणार होती! कदाचित आसपासच होती, पण मीच ओळखू शकत नव्ह्ते. एव्हाना त्या शब्दांनी माझ्याभोवती फेर धरला होता. त्यांच्या पदन्यासाला एक वेगळाच, मस्त ताल होता! मीही त्यात रंगून गेले. पण कसलीतरी कमतरता जाणवत होती. कसली ते लक्षात येत नव्हतं. काहीतरी अधुरं अधुरं होतं. आणि अचानक माझ्या कानात एक आवाज घुमला, "अगं तुझे साथीदार!" आणि एका क्षणार्धात माझ्या डोक्यात प्रकाश पडला! जणू काही सगळं लख्खं चित्र नजरेसमोर होतं. सेकंदाचाही विलंब न करता मी माझ्या साथीदारांना साद घातली. ते माझे भरवशाचे ’सात’ शिलेदार होते. माझ्याबरोबर त्या दुनियेत येऊन त्यांनी मला वाट दाखवायला सुरुवात केली! त्या अद्भुत दुनियेची सैर घडवत घडवत, त्यांनी मला तिथे नेऊन उभी केली, जिथे मी मगाशी शब्दांच्या रिंगणात रमले होते! आम्ही तिथे पोहोचायचा अवकाश, जादू झाल्यासारखं शब्दांच्या आडून कोणीतरी समोर येऊन उभं राहिलं. मी कोण आहे ते पाहिलं मात्र आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. माझ्या पुढ्यात ’ती’ उभी होती! आता माझ्या सात साथीदारांनीही शब्दांच्या बरोबरीने फेर धरण्यात सहभाग घेतला होता. आणि त्या रिंगणाच्या मधोमध आम्ही दोघी!


मी..... आणि इतके दिवस जिच्या प्रतिक्षेत, साधनेत उत्सुक आणि बेचैन होते,


’ती’, "माझी चाल!"

                                                                                                                                     

- सुखदा भावे-दाबके

15 views0 comments
bottom of page