top of page

"अनुबंध"


"अनुबंध"


© सुखदा भावे-दाबके


अखेर राम शहरात उच्चशिक्षणासाठी येऊन ठेपला...

छोट्याश्या खेड्यातल्या अनाथाश्रमात वाढलेला.. पण शिक्षणाचा ध्यास आणि प्रचंड मेहनती..

पेपरची लाईन, किराणा दुकानावर काम, नंतर पार्ट टाईम जॉब, मग फुल टाईम.. रात्र कॉलेज..  असं सगळं करून मेरिट आणि स्कॉलरशिप्सवर डिग्री पूर्ण केली.. 

उच्चशिक्षणाच्या स्वप्नाकडे वाटचाल सुरू.. आश्रमातल्या एका कार्यकर्त्याच्या ओळखीने एका मोठ्या संस्थेची मदत.. 

आणि शहरात पाऊल ठेवलं..

तसं आऊटस्कर्ट्सलाच होतं पण कॉलेज उत्तम होतं..

पेईंग गेस्ट म्हणून एका घरी राहायची सोय कशीबशी झालेली.. 

बंगलाच होता छोटासा टुमदार.. 

साऊथ इंडियन म्हातारी एकटीच राहायची..

अय्यर.. भयंकर खडूस.. 

तसं रामला कळलेलं हे आधी पण त्याचा नाईलाज.. 

त्याला परवडेल अशी ही एकच सोय उपलब्ध.. म्हातारी खूप बोलायची.. 

फार नियम घातले होते.. 

चहा-जेवणाच्या वेळा, जायच्या यायच्या वेळा, कुणाला बोलवायचं नाही, सुट्टीच्या दिवशी साफसफाई, बाजारहाट.. 

हा मुकाट्यानं ऐकून घ्यायचा... 

जीव मेटाकुटीला यायचा बिचाऱ्याचा.. 

पण कधी अक्षर नाही काढलं.. 

एकतर सोय हवी होती आणि दुसरं म्हणजे त्या म्हातारीत राम आई शोधायचा.. आईचा चेहरा नाही पाहिला कधी.. पण का कोण जाणे त्याला वाटायचं आपली आई असती तर अशीच असती.. 

गपगुमान सगळी कामं करायचा तिची.. मग अभ्यास..

एक दिवस सकाळी राम उठला.. 

'आज आरड्याओरड्याने जाग नाही आली? अलार्म वाजेपर्यंत झोपलो.. असं कसं?'

खाली येऊन बघतो तर बंगला चिडीचूप.. 

हळूच अय्यरबाईंच्या खोलीत डोकावला..

हलका कण्हण्याचा आवाज.. कपाळाला हात लावून पाहिला तर तापलेलं.. तेवढ्यात हात झटकला गेला रामचा.. तसाच बाहेर आला.. कॉफी केली, मग उशाशी नेऊन ठेवला.. सोबत तापाची गोळी ठेवली.. मुद्दाम थोडासा आवाज करत पाण्याची बॉटल आणि ग्लास ठेवला..

बाहेर येऊन सोफ्यावर बसून राहिला..

दहा मिनिटांनी आतून ग्लासचा आवाज.. नंतर कॉफी मगचा आवाज..

दांडी मारणं परवडणार नव्हतं पण अय्यरबाईंची काळजीही वाटत होती..

मग चक्क एका थर्मासमध्ये कॉफी, दुसऱ्यात सूप, पाण्याची बॉटल, ग्लास, शेजारी तापाच्या गोळ्यांची स्ट्रिप, नॅपकिन, अंग दुखलं तर म्हणून शेकायची पिशवी, दोन सफरचंद, सोबत कटर..

बेडशेजारच्या टेबलवर अशी सगळी जय्यत तयारी करून राम कॉलेजला गेला..

त्या दिवशी कॉलेज संपल्यावर नो लायब्ररीत अभ्यास.. तडक घरी..

दोन्ही थर्मास रिकामे, एक सफरचंद खाल्लेलं..

मग राम कामाला लागला..

गरमगरम वाफेवरचा मऊसर भात, किचनमधले डबे अतिशय गुपचूप शोधून कसंबसं मिळवलेलं लिंबाचं लोणचं असं एका प्लेटमध्ये टेबलवर विराजमान.. 

शेजारी पाण्याची बॉटल रिफिल करून ठेवली..

बाहेर सोफ्यावर येऊन बसला..

दहा मिनिटांनी आतून प्लेटचा आवाज..

समाधानाने हसला...

जेवून सोफ्यावरच झोपला.. वर नको.. 

रात्रीत हाक आली चुकूनमाकून तर..

हा क्रम चार-पाच दिवस चालू राहिला..

आणि एक दिवस पुन्हा रामला आरड्याओरड्याने जाग..!!

राम हसतच उठला.. रुटीन सुरू..

पण आता जाच थोडासा कमी झालेला.. प्रत्येक वीकेंडऐवजी महिन्यातले दोनच वीकेंड घरकामात.. क्वचित रात्री फ्रुट्स किंवा ज्यूस वगैरे..

अभ्यासही वेगात सुरू.. परिणामी प्रत्येक सेमिस्टरला आलेख चढता..

नंतर त्याला एका पार्ट टाईम जॉबची संधी मिळाली.. अभ्यास सांभाळून जमणार होतं म्हणून लगेच काम सुरू केलं..

भयंकर तारेवरची कसरत..

आजारपणाच्या आधीची अय्यरबाई असती तर एव्हाना रामचं काही खरं नव्हतं.. पण म्हातारी थोडी बदलली होती.. नियमही थोडे शिथिल झाले होते..

महिनाभर होत आला..

आणि एका वीकेंडला म्हातारीची एक मैत्रीण भेटायला आली.. आठ दिवस राहणार होती..

तिच्यासमोरही नेहमीचा आरडाओरडा, रामला थोडंसं का होईना बोलणं, इत्यादी कार्यक्रम चालूच.. 

मैत्रीण सगळं निरखत होती..

पुढला वीकेंड संपल्यावर सोमवारी राम कॉलेज, जॉब संपवून घरी आला तेव्हा अय्यरबाईची मैत्रीण जायला निघाली होती.. शेकहँडच्या निमित्ताने रामच्या हातात एक कागद सरकवला.. अय्यरबाई गेटमध्ये अच्छा करायला गेलेली असताना उलगडून वाचला..

'सी मी नियर द बस स्टॉप..'

तडक निघाला.. मागे आरडाओरडा वाढला..

'इमर्जन्सी...' एवढंच तोंड वळवून मोठ्या आवाजात सांगितलं..

मैत्रिणीने भडाभडा सगळं सांगितलं..

अय्यरबाई पूर्वी अतिशय प्रेमळ..

पैशाची गरज नव्हती पण एक सोबत होईल म्हणून घर पीजीसाठी ओपन केलेलं..

शिक्षणाची फार आस आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कोण कौतुक.. म्हणून विद्यार्थीच हवा ही अट..

राम तिचा दुसरा पेईंग गेस्ट..

पहिली एक विद्यार्थिनी..

अगदी मुलीसारखी वागवायची.. 

पण तिने घात केला.. हिला बेशुद्ध करून मित्राच्या मदतीने घर लुटून नेलं.. 

सगळं संपलं.. माणसांवरचा विश्वास उडाला..

पण आता आर्थिक गरज म्हणून पीजी हवा..

तेव्हापासून कोणाही अनोळखी व्यक्तीशी तुटक वागते.. पीजी ठेवला पण मनात धास्ती.. 

प्रचंड कडवटपणा.. म्हणून वाईट वागवते..

'तुला पाहिलं आठ दिवस.. चांगला माणूस दिसलास म्हणून सांगावसं वाटलं..'

रामचं काळीज पिळवटलं..

घराकडे धावत सुटला..

अय्यरबाई सोफ्यावरच बसलेली..

तिच्यापाशी गेला..

हात आपसुक खिशाकडे गेला.. आज इथल्या पहिल्या नोकरीचा पहिला पगार जमा झाला होता.. येताना बँकेतून काढून आणलेलं कॅशचं बंडल रामने अय्यरबाईच्या पायावर ठेवलं.. हात हातात घेऊन ढसाढसा रडला..

अय्यरबाई थक्क.. रामच्या हातातली माया पोचली तिच्या काळजापर्यंत..

रामकडे बघता बघता तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळायला लागली..

त्यातून बहुतेक सगळा कडवटपणाही वाहून जात होता..

रामच्या डोक्यावर थोपटायला अय्यरबाईचा हात वर झाला..

मायलेकराच्या नात्याचा अनुबंध गुंफला जात होता...!!


© सुखदा भावे-दाबके


#marathistory #momsonrelation #payingguest #relations #emotionalstory

70 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page