ब्लॉग! स्वतःला जगासमोर व्यक्त करण्याचं एक अतिशय प्रभावी, सोपं माध्यम.

ब्लॉग! स्वतःला जगासमोर व्यक्त करण्याचं एक अतिशय प्रभावी, सोपं माध्यम. आपण लिहिलेला लेख, काव्य, माहिती आपल्याला हव्या असलेल्या वेळी प्रकाशित करण्याची मुभा देणारं, हव्या त्या लोकांसोबत शेअर करण्याचं स्वातंत्र्य देणारं, आपलं लिखाण क्षणात जगातल्या कोणत्याही ठिकाणी उपलब्ध करुन देणारं शक्तिशाली माध्यम! पण हे माध्यम वापरण्याच्याही काही खास पद्धती आहेत, ज्या अमलात आणल्यावर तुम्ही एक अतिशय यशस्वी ब्लॉगर होऊ शकता. शिवाय ब्लॉगिंगमधून कमाईही करु शकता! आजचा हा लेख तुमच्या ब्लॉगची छबी लोकप्रिय करण्यासाठीच!
फर्स्ट ईम्प्रेशन:
तुमच्या ब्लॉगवर आल्याक्षणीच विझिटर खिळून राहिला पाहिजे. 'बघूया तरी काय लिहिलंय' असा विचार मनात निर्माण करणारं ब्लॉगचं प्रथमदर्शी चित्र उभं राहायला जेमतेम काही सेकंद पुरेशी असतात. या फर्स्ट ईम्प्रेशनमधले काही महत्वाचे घटक:
नांव:
सगळ्यांत बेसिक गोष्ट म्हणजे ब्लॉगचं नांव! तुमच्या लिखाणाच्या शैलीशी कनेक्ट होणारं, बघताक्षणीच इंटरेस्टिंग वाटणारं नांव, सुरुवातीच्या काही सेकंदातच विझिटरला धरुन ठेवतं. ब्लॉगची पर्सनॅलिटी तयार होण्यात या नावाचा मोठा वाटा असतो! म्हणून नांव फायनल करताना विचारपूर्वक करा.
होस्ट:
ब्लॉग लिहिण्याची काही डोमेन्स आहेत जी लिखाणासाठी स्पेस, तयार थीम्स, लिहिण्यासाठी आणि लिखाण जास्त आकर्षक करण्यासाठी ठराविक टेम्प्लेट्स, लोकांचे अभिप्राय लिहिण्यासाठी जागा, इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देतात. ब्लॉगस्पॉट आणि वर्डप्रेस ही सध्याची आघाडीची डोमेन्स आहेत. आपली स्वतःची वेबसाईट असल्यास त्यावरही एक ब्लॉग पेज सुरू करता येतं.
थीम:
ब्लॉगची थीम निवडताना बरीच कसरत असते. अनेक छान थीम्समधून एकच निवडायची असते. अशा वेळी जी थीम आपल्या लिखाणाच्या विषयाला, स्टाईलला आणि ब्लॉगच्या नावाला सूट होते तीच घ्यावी. यामुळे एक कम्प्लिट व्हिज्युअल् इंपॅक्ट तयार होण्यासाठी मदत होते. थीम फार गॉडी नसावी तसंच अती साधी पण नसावी.
बेसिक गोष्टी:
ब्लॉगरचं नांव, प्रोफाईल फोटो, ब्लॉगरची माहिती, इत्यादी गोष्टी अगदी अपटूडेट असाव्यात. या गोष्टी ब्लॉगला भक्कम सपोर्ट देतात आणि त्याची ऑथेन्टिसिटी पक्की करतात.
रायटिंग स्किल्स:
जेव्हा ब्लॉगचे बेसिक फीचर्स तयार होतात त्यानंतर ब्लॉगचा स्वतःचा एक अपीअरन्स बनतो आणि त्याला कॅरॅक्टर देण्याचं काम ब्लॉगवर असलेलं लिखाण करतं. या लिखाणावरच तुमच्या ब्लॉगचं सगळं यश अवलंबून असतं. म्हणूनच ब्लॉगिंग करताना सगळ्यात जास्त मेहनत लिखाणावर घ्यायला हवी!
विषय:
सतत नवीन काहीतरी देण्याची प्रचंड गरज ब्लॉगर्सना असतेच. यासाठी थोडा अभ्यास करायला हवा. लोकांशी संवाद साधून, इंटरनेटवरील इतर यशस्वी ब्लॉग्ज बघून विषयांमध्ये प्रयत्नपूर्वक सतत नाविन्य आणणं हे ब्लॉगरचं परमकर्तव्य. इंटरनेटवर रिसर्चद्वारे, जास्तीत जास्त पॉप्युलर असलेले, हटके आणि युनिक असलेले टॉपिक्स सहज मिळू शकतात.
स्टाईल:
लिखाणाची स्टाईल ठरवून घेणं प्रत्येक लेखासाठी आवश्यक असतं. एखाद्या विषयाला विनोदी शैली, एखाद्याला थोडी गंभीर, कधी औपचारिक तर कधी अनौपचारिक शैली. जसा विषय आहे त्यानुसार शैली स्विकारणं हे तुमच्या लिखाणाची ताकद दाखवून देण्यास मदत करतं. तुम्ही वापरलेली भाषा, तुमच्या लिखाणाचा फ्लो, हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. एकदा तुमची रायटिंग स्टाईल एस्टॅलिश झाली की ती तुमच्या ब्लॉगमधलं एक कॅरॅक्टर बनून जाते.
इमेज:
ज्या विषयावरची पोस्ट तुम्ही ब्लॉगवर लिहित असाल, त्या विषयाशी रिलेटेड एखादा छान फोटो पोस्टवर अपलोड केल्यास सोशल शेअरिंग करताना इमेजचा रीच वाढण्याची शक्यता जास्त असते. इमेजेस असलेल्या पोस्ट्ससोबत त्या इमेजचं थम्बनेल दिसत असल्याने त्यावर होणाऱ्या क्लिक्सची संख्या निश्चितच जास्त असते. पर्यायाने पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचून, ती वाचली जाऊन आपल्या ब्लॉगचेच वाचक वाढतात.
ओरिजिनॅलिटी:
ब्लॉगवर तुम्ही लिहित असलेला कन्टेन्ट तुमचा स्वतःचा असणं सगळ्यांत महत्वाचं असतं. तुम्ही मेहनत घेऊन, रिसर्च करून स्वतः केलेलं अभ्यासपूर्ण लिखाण वाचकाला नक्कीच तुमच्या ब्लॉगकडे पुन्हा येण्यास भाग पाडतं. इकडून तिकडून उचलेगिरी करून ब्लॉगवर पेस्ट केलेलं लिखाण ब्लॉगला कधीच यश मिळवून देत नाही. शिवाय अशा कॉपी करण्यात कॉपीराईट्स उल्लंघन केल्याचा धोका असतो ज्यामुळे तुमच्या ब्लॉगवर मोठी ऍक्शन घेतली जाऊ शकते. त्यामुळे ब्लॉगवर फक्त आणि फक्त ओरिजिनल लिखाणंच करावं.
सोशल शेअरिंग:
तुम्ही अतिशय अप्रतिम लेख लिहिला आहे खूप मेहनत घेऊन, पण तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर तुमची सगळी मेहनत वाया! लेखनाएवढंच ब्लॉग प्रमोशनला महत्व आहे. तुमचा ब्लॉग तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये शेअर करायला हवा. तुमचा ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अनेक मार्ग आहेत. बघूया त्यातलेच काही.
सोशल साईट्स:
एका क्षणात जगापर्यंत ब्लॉग पोहोचवण्याचं उत्तम माध्यम. फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम, गूगल प्लस इत्यादीवरून अक्षरशः कोट्यवधी लोकांपर्यंत आपला ब्लॉग जाऊ शकतो! त्या त्या वेबसाईटचे खास फंडे वापरून आपल्या पोस्टला लोकप्रियता मिळवता येते.
व्हॉट्सऍप:
हल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो आणि त्यात व्हॉट्सऍप! मग त्याच सुविधेचा वापर आपल्या लिखाणासाठी करायचा. ब्लॉगची लिंक इंक्लुड करून एक छान मेसेज तयार करायचा आणि त्यात ब्लॉगला भेट देण्याची विनंती करायची. हा मेसेज आपले सगळे ग्रुप्स, पर्सनल काँटॅकट्स यांना पाठवायचा. सिलेक्टेड लोकांची ब्रॉडकास्ट लिस्ट पण तयार करता येते. तशी करून त्या लिस्टला पाठवला की एकाच वेळेस हव्या तेवढ्या लोकांना व्हॉट्सऍप मेसेज पोहोचतो.
ईमेल:
हा शेअरिंगचा एक स्मार्ट पर्याय आहे. यात आपण पर्सनली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या सवडीनुसार आपला ईमेल बघण्याची मुभा राहते. जेव्हा ती व्यक्ती लॉगिन करेल त्याचवेळी तिला ईमेल दिसत असल्याने आपण त्या व्यक्तीची प्रायव्हसीही जपतो! ईमेल हा शेअरिंगचा एक प्रोफेशनल पर्याय मानला जातो.
विजेट्स:
विजेट्स म्हणजे काही छोटी ऍप्लिकेशन्स असतात जी ब्लॉगवर चिकटवून त्यायोगे काही माहिती जनरेट करता येते. ब्लॉगला टेक्निकली थोडं ऍडव्हान्स बनवण्यासाठी विजेट्स मोठा वाटा उचलतात. या विजेट्च्या वापरामुळे ब्लॉगच्या वाचकांची संख्या, ब्लॉगची लोकप्रियता याचा अंदाज येतो. ही सगळी विजेट्स कशी वापरायची याची सविस्तर माहिती गूगलवर उपलब्ध आहे.
विझिटर्स काऊंट:
हे विजेट आपल्याला ब्लॉगला किती वाचकांनी भेट दिली ती अचूक संख्या सांगतं. अगदी दर्शनी भागात हे विजेट सेट केल्यास ब्लॉग ओपन केल्या केल्या त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज विझिटरला येतो आणि ब्लॉगकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो.
पॉप्युलर पोस्ट्स:
तुमचं सर्वोत्तम लिखाण अगदी लगेच मिळण्यासाठी हा छान पर्याय आहे. ज्या पोस्ट्सना सर्वाधिक वाचकपसंती मिळेल त्या पोस्ट या विजेटद्वारे वाचकांना ऑलमोस्ट हातात दिल्या जातात. त्यामुळे बेस्ट असेल ते त्यांच्यापर्यंत लगेच पोचतं.
व्हिडियो:
यामध्ये डायरेक्ट यूट्यूबवरचे व्हिडियो आपल्या ब्लॉगवर दाखवता येतात. यामुळे एक वेगळा मीडिया ब्लॉगवर इंट्रोड्यूस होतो. वाचन करताना वाचकाला एकीकडे काही ऐकावंसं, बघावंसं वाटलं तर त्याच्या हाताशी उत्तम व्हिडियो मिळतात. हे व्हिडियो ब्लॉगशी, त्याच्या विषयाशी रिलेटेड असावेत म्हणजे अगदीच भरकटल्यासारखं होणार नाही.
सोशल नेटवर्किंग पेजेस:
तुमच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरच्या प्रोफाईल्स या विजेटद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतात. तुमचं पेज लाईक करायचं असेल, तुम्हांला फॉलो करायचं असेल, किंवा तुमचं लिखाण सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करायचं असेल, या विजेटमध्ये वाचकाला सगळे पर्याय मिळतात. आणि तुमचा ब्लॉग जितका जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकीच वाचकसंख्या, लोकप्रियता आणि पर्यायाने तुमचं यश वाढत जाईल.
ऍडसेन्स:
एकदा का तुमचा ब्लॉग प्रचंड लोकप्रिय झाला, की तीच असेल योग्य वेळ जाहिराती दाखवून ब्लॉगमधून उत्पन्न मिळवायची! ऍडसेन्सवर तुमचं अकाउंट तयार करून तुमचा ब्लॉग ऍडसेन्सवर रजिस्टर करा. व्हेरिफिकेशन यशस्वीपणे पार पडलं की तुमच्या ब्लॉगवर वेगवेगळ्या जाहिराती येण्यास सुरुवात होईल. या जाहिरातीं बघितल्या गेल्या अथवा क्लिक केल्या गेल्या की त्याचा योग्य तो मोबदला मिळतो. आवड जोपासताना कमाई करण्याची हि बेस्ट पद्धत आहे!
#blog #blogging #blogger #bloggingart #bloggerlife #howtowriteablog #monetization #writing
तर या होत्या काही सोप्या पण आवश्यक अशा ब्लॉगिंग टिप्स! जरूर इंप्लिमेंट करा आणि बना एक यशस्वी ब्लॉगर! आर्टिकल आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!
- सुखदा