top of page

How To Get Inspiration for Composing Lyrics


शब्द बघून काहीतरी चाल किंवा एखादं म्युझिकल स्ट्रक्चर डोक्यात येणं ही एकतर दैवी देणगी असण्याची किंवा अनेक वर्षांच्या तपश्चर्येची गोष्ट आहे! जेव्हा आपण स्वतःसाठी कंपोझ करत असतो त्यावेळी चाल सुचायला हवा तेवढा वेळ देऊ शकतो, पण ज्यावेळी आपण हे प्रोफेशन म्हणून दुसऱ्या कोणासाठी कंपोझ करत असतो तेव्हा या गोष्टीला एक डेडलाईन मिळते आणि या कालावधीतच आपल्याला ती चाल पूर्ण करावी लागते. अशा वेळी सुचेल तेव्हा करू असं अवलंबून राहता येत नाही आणि तेव्हा उपयोगी येतात अशा काही गोष्टी ज्यांचा आधार घेऊन संगीतकार त्या चालीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू शकतो.


हॅलो गाईज, मी सुखदा भावे-दाबके, कंपोझर, अरेंजर, प्रोड्युसर, लिरिसिस्ट, ऑल इंडिया रेडियो ग्रेडेड आर्टिस्ट आणि शुभसूर क्रिएशन्सची फाऊंडर.


या व्हिडियोत आपण क्विकली बघणार आहोत असे काही पॉइंट्स जे मदत करू शकतात शब्दांना चाल लावायला जेव्हा आपल्याला इन्स्पिरेशन मिळत नसतं!


१. भावना


सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया. एका संगीतकाराला चालीतून जे पोचवायचं असतं त्यात पहिल्या नंबरवर असलेली गोष्ट म्हणजे शब्दांतली भावना. नक्की कोणतं एक्स्प्रेशन शब्दांतून व्यक्त होतंय हे शब्द वाचता वाचताच कळायला हवं किंबहुना कंपोझरचं पहिलं लक्ष तिकडे असावं. एकदा का ती भावना लक्षात आली की आपल्या हाताशी असतात सुरांची कॉम्बिनेशन्स म्हणजेच शास्त्रीय संगीतातली रागदारी! प्रत्येक रागातून कुठली ना कुठली इमोशन एक्स्प्रेस होतच असते. अर्थात यात अपवाद आहेत किंवा याच पद्धतीने सुरुवात व्हायला हवी असा नियम नाही. असंही होऊ शकतं की एखादा आनंदी सुरावट असलेला राग दुःखी भावना सांगायला वापरला जाऊ शकतो, योग्य प्रकारे चाल बांधल्यास. पण नवीन कलाकारांसाठी सुरुवात करायला हे रागदारीमधले थाट खूप मदत करू शकतात. यासाठी कलाकाराचं वाचन चांगलं असायला पाहिजे. उत्तमोत्तम कवींच्या कविता, गीतं वाचली पाहिजेत. म्हणजे त्यातली भावना पटकन ओळखण्याची सवय होईल.


२. भाषा


आता इथे भाषा म्हणजे मराठी हिंदी असं काही अपेक्षित नाही. साधारण आपल्याला परिचित भाषेतच आपण चाल करायला घेतो किंवा तशीच कामं आपल्याकडे येतात. आपण मराठीबद्दल बघू उदाहरण म्हणून. गीत वाचल्यावर त्यातल्या इमोशननंतर प्रामुख्याने बघण्याची गोष्ट म्हणजे त्या शब्दांचा लेहजा. ते शब्द कसे प्रकट होतायत, एकदम शुद्घ सात्विक साज आहे का थोडा गावरान, रांगडा बाज आहे, लोकगीत प्रकारात येतायत का. ते गीत ज्यांच्या मुखी दाखवलं जाणार आहे किंवा ते गीत म्हणणारं जे कॅरॅक्टर आहे ते कोण आहे? एखादी कथ्थक नर्तिका आणि एखादा शेतकरी सारखं गाणार नाहीत. त्यांची भाषा वेगळी असेल, फॉर्म वेगळा असेल. एखादं भावगीत ज्याप्रकारे शब्दांना उलगडेल त्याच प्रकारे एखादा पोवाडा नाही करणार. काही प्रकारच्या शब्दांना हळुवार सुरावट अपेक्षित असते तर काहींना पहाडी उंच सुरांशी मैत्री करायची असते! वेगवेगळया जॉनरचं संगीत ऐकणं हा यासाठी उत्तम रियाज.


३. शब्दांचं व्याकरण


व्याकरण हे गाण्याच्या स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण शब्दांमधल्या अक्षरांच्या ह्रस्व दीर्घ वजनानुसार त्यांचं मीटर ठरतं. मीटर म्हणजे वृत्त. म्हणजे भुजंगप्रयाती य चारीही येती. मासाजासतताग येती गण ते शार्दूलविक्रीडित, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. या सगळ्या ओळींना स्वतःचा ताल आहे. तो ताल ओळखून तशी चाल लावणं हे काम संगीतकाराचं. असं बंधन नसतं की कवितेच्या मीटरनुसार त्या तालातच चाल लावली पाहिजे, वेगळा ताल घेऊनही चालेल पण त्या तालामध्ये शब्दांचं ह्रस्व दीर्घचं व्याकरण सांभाळलं जायला हवं. याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे मराठी अभिमानगीत! सुरेश भट यांनी लिहिलेल्या गीताचं मीटर खरंतर ६/८ चं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. पण कौशल इनामदार या कमाल संगीतकाराने, कंपोझ करताना यात एक मात्रा add केली आणि त्याचं मीटर ७/८ झालं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! अर्थात त्याचं ह्रस्व दीर्घ व्याकरण सांभाळून. आणि कौशल दादाने असं केल्याने  या गाण्याला जो एक प्रकारचा ठहराव पाहिजे तो अतिशय बखुबीने आला! जायंट इफेक्ट add झाला त्यात! अर्थात यासाठी लागते प्रचंड प्रतिभा आणि ती डेव्हलप होण्यासाठी पुन्हा एकदा दर्जेदार साहित्याचं वाचन! उत्तम गाण्यांचं श्रवण आणि ते करत असताना ते analyse करण्याचा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न!


४. प्रसंग


प्रत्येक कवितेत, गीतात एक सिच्युएशन मांडलेली असते. भले ते एखाद्या नाटकाचा किंवा फिल्मचा भाग असो अथवा स्वतंत्र गाण्याचं प्रोजेक्ट असो. गीत म्हणजेच लिरिक्स वाचल्यानंतर सगळ्यात आधी ती सिच्युएशन समजून घ्यायचा डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न करा. जर गाणं एखाद्या नाटकासाठी, फिल्मसाठी, व्हिडियोसाठी करायचं असेल तर साहजिकच त्यात मांडलेला असतो एखादा प्रसंग किंवा प्रसंगानुरूप इमोशन. उदाहरणार्थ हिरो हिरॉईनला प्रपोज करतोय किंवा त्या दोघांच्यात काहीतरी प्रॉब्लेम होऊन विरह आलाय. मित्र मित्र जमून मैफिल करतायत, कॉलेज कट्ट्यावर दोस्त बसलेत, एखादे वयस्कर आजोबा एकटेच त्यांच्या आता जगात नसलेल्या जोडीदाराच्या आठवणीत रमलेत, आई बाळाला झोपवतेय, एखादी स्पोर्ट्स टीम मॅचची जोमाने तयारी करतेय अशी कोणतीही सिच्युएशन असू शकते. आणि त्या सिच्युएशनचा फील इमॅजिन करुन त्यानुसार म्युझिक तयार करायला पाहिजे. एकदा तो फील पक्का मिळाला की मग शब्द त्या फीलच्या चालीत बसायला वेळ लागणार नाही.


५. स्केल, इन्स्ट्रुमेंट, ह्रिदम पॅटर्न


कधी कधी असं होतं की शब्दांमध्ये फील असतोच पण त्यात लपलेली चाल शोधून काढायला मदत करतात काही तांत्रिक बाबी. उदाहरणार्थ, पहाटेच्या वेळेच्या वर्णनासाठी भटियार, चंद्र चांदण्या कंपोझ करायला यमन, किंवा विरह आहे तर एखादा मायनर स्केल किंवा गंधार धैवत निषाद कोमल असलेला राग, इनडोअर आऊटडोअर प्रमाणे हळुवार सुरावट किंवा पहाडी खडी सुरावट अशा अनेक गोष्टी मदतीला येऊ शकतील. शब्द पाहून एखादं इन्स्ट्रुमेंट चटकन डोळ्यांसमोर येऊ शकतं, किंवा एखादं वाद्यांचं कॉम्बीनेशन सुचू शकतं. अर्थात हे सगळे काही नियम नाहीत की असंच कंपोझ करायला हवं किंवा या टेक्निकल गोष्टी पाळल्याच पाहिजेत. हे जस्ट क्ल्यू म्हणून कामी येऊ शकतात.


६. रेफरन्सेस


शब्दांवरून आपल्याला त्या गाण्याचा जॉनर कोणता असणार याचा अंदाज येतो. मग त्या जॉनरची बाकी गाणी शोधून ती ऐकून त्यांचा अभ्यास करायचा. कशा शब्दांना कशी चाल लावलीय, ओव्हरऑल गाण्याचं स्ट्रक्चर कसं आहे. टेम्पो, स्केल काय वापरलं आहे. काही स्पेसिफिक राग वापरलाय का? या सगळ्या गोष्टींवरून आपल्या नोट्स तयार करायच्या त्या गाण्याबद्दल. अशी अनेक गाणी अभ्यासायची. हे सगळे असतात आपले रेफरन्सेस. हे सगळे आपला बेस तयार करतात. पण कटाक्षाने त्यातलं काहीही आपल्या कामात चोरी होऊ द्यायचं नाही. आपलं ओरिजिनल काम करायचा प्रयत्न ठेवायचा. ज्या प्रकारचे शब्द तुम्हाला कंपोझ करायचेत, त्यानुसार तुमचे रेफरन्सेस बदलत जातील.


तर गाईज या होत्या अशा काही टिप्स ज्या नवीन संगीतकारांना उपयोगी ठरु शकतील शब्दांना चाल लावायला. अर्थात या सगळ्या गोष्टी टिपण्यासाठी तुम्ही अलर्ट असलं पाहिजे. शब्द आपल्याला नेहमीच मदत करत असतात, चाल इंडिकेट करत असतात. त्या इंडिकेशन्स ओळखून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. व्हिडियो आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. सबक्राईब करा. आपण भेटू पुढल्या व्हिडियोत तोपर्यंत गुडबाय. Do follow your passion, everything else will fall in place!


-सुखदा भावे-दाबके

3 views0 comments
bottom of page