का झुरावा जीव वेडा... (भाग १)


समायराने घड्याळ बघितलं, ९ वाजून २५ मिनिटं.. लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर काढून घेऊन तिने दोन्ही हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवले तेव्हा तिला जाणवलं की गेला कितीतरी वेळ ती त्या स्क्रीनकडेच बघत होती.. तिचं प्रेझेंटेशन इम्प्रेसिव्ह झालं होतं. डील क्रॅक होणार याची खात्री होती तिला, आणि तिच्यापेक्षा जास्त तिच्या बॉसला.. कारण समायराने एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी घेतली की क्लोझरपर्यंत एकाही स्टेपचं टेन्शन नाही. प्रत्येक मूव्ह परफेक्ट प्लॅन केलेली, प्रत्येक डिसीजन प्रोजेक्टचा डीप स्टडी करूनच घेतलेला…


समायरा कारखानीस, अत्यंत महत्वाकांक्षी, स्मार्ट पर्सनॅलिटी असलेली मुलगी.. मूळची सासवडची. श्रीमंत म्हणावं असं घर. पण आई वडील ती लहान असताना एका दुर्दैवी कार अपघातात ऑन द स्पॉट गेले. कष्टाने इमानदारीची बरीच पुंजी जमवलेली. त्यामुळे आर्थिक चणचण नाही जाणवली. समायराची एक आत्या जिने लग्न नव्हतं केलं ती यांच्याच घरी राहायची. सुरुवातीला तिचा आधार होता समायराला पण आई वडिलांनंतर दोन वर्षांनी एक सिव्हीयर अटॅक येऊन तीही समायराला सोडून गेली.. बाकी आपलं म्हणावं असं नातेवाईक कोणी नावालाही नाही. जिद्दीने समायराने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आणि तिची महत्वाकांक्षी स्वप्नं तिला मुंबईकडे खेचायला लागली. सासवडच्या बंगल्याव्यतिरिक्त बरीच जमीन होती वडिलांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेली.. ती सरळ विकून ही मुंबईत दाखल झाली, टू बीएचके घेतला, एका अपकमिंग ऍड एजन्सीमध्ये नोकरी मिळवली. सुरुवातीला बेसिक कामं करत करत मेहनतीने आणि बुद्धीच्या जोरावर एक एक पायरी वर चढत गेली. एजन्सीही नावारूपाला येऊ लागली. समायराचा वाटा त्यात महत्वाचा असल्याने साहजिकच बिझनेस डेव्हलपमेंट हेड म्हणून एकमताने तिचं सिलेक्शन झालं.. त्या दिवसापासून आजपर्यंत काम काम आणि फक्त काम. वर्कोहोलिक या शब्दाला लाजवेल अशी समायराच्या कामाची पद्धत. तिच्या घराने तिला रात्री साडेअकराच्या आधी आणि सकाळी साडेआठनंतर कधी बघितलंच नव्हतं. विकेन्ड्स नको वाटायचे तिला. मग तेव्हाही एजन्सीची कामं काढून बसायची.. मंदा बऱ्याचदा सांगायची तिला, “ताई, सुटीच्या दिवशी उगा कशाला तो लापटाप घेऊन बसलायसा? जावा की जरा बाहेर, मैत्रिणींना भेटा, सिनेमा बघा..” समायरा मग तिला गप्प करून पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसायची..

तर साधारण पावणेदहा वाजता समायराने समाधानाने लॅपटॉप शट डाऊन केला.. चेकलिस्टच्या शेवटच्या नंबरवर डन म्हणून मार्क करून ती सरळ केबिनबाहेर आली.. लिफ्टमध्ये शिरता शिरता बॉसला ऑल सेट फॉर टुमॉरो असा मेसेज करून टाकला आणि संध्याकाळभरचे मेसेजेस चेक करायला लागली.. वाचता वाचता, काहींना रिप्लाय करता करता अचानक एका मेसेजवर तिची नजर खिळून राहिली.. ‘ट्वेन्टी थर्डला मुंबईत येतोय. दोन दिवसांसाठी असेन. जमलं तर भेटूया..’


चार वर्षांपूर्वीचा तो दिवस, एस्पेशली संध्याकाळ, तिच्यासमोर जशीच्या तशी फिल्मसारखी सरकायला लागली. पुण्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्पेशल कँडल लाईट डिनर, तिचा आवडता मेन्यू, मागे अतिशय रोमँटिक ट्यून्स छेडणारी लाईव्ह गिटार.. आणि अशा खास प्लॅनमध्ये शंतनू यज्ञोपवीतने समायराला केलेलं प्रपोज! आहा..!! शंतनूचं घराणं पुण्यातल्या बड्या उद्योजकांपैकी एक. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. देश विदेशात पसरलेला बिझनेस, हजारो करोडचा टर्नओव्हर, मीडियाने बिझनेस टायकून म्हणून वेळोवेळी दिलेली प्रसिद्धी आणि असं असूनही अतिशय नम्र, संस्कारी, माणूस म्हणून जगणारी फॅमिली! शंतनूही रुबाबदार, हँडसम, निर्व्यसनी, सुस्वभावी, परदेशातून उच्चशिक्षण घेऊन फॅमिलीच्या प्रेमासाठी आणि माझ्या भारतातच मला काहीतरी करायचंय या विचाराने परत आलेला. समायराची शंतनूशी ओळख कॉलेजमधली. स्मार्ट, महत्वाकांक्षी समायरा शंतनूला पाहिल्याक्षणी आवडली. आणि शंतनूशी तर ओळख करून घेण्यासाठीही मुली मरायच्या.. कॉलेजची रंगीबेरंगी वर्षं भुर्रकन उडून गेली.. आता पुढल्या आयुष्याची दिशा ठरवायची होती.. तरीही शंतनूने प्रपोज करायची घाई केली नाही.. उच्चशिक्षण झाल्यावर, बिझनेसच्या एका ब्रँचची जबाबदारी स्वतंत्ररित्या सांभाळायला लागल्यावरच त्याने समायराला प्रपोज करण्याचा डिसीजन घेतला.

आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर, त्या संध्याकाळी समायराने शंतनूशी लग्न करायला नकार दिला!


टू बी कन्टीन्यूड... (क्रमशः)


- सुखदा भावे-दाबके


#lovestory #love #couple #friend #friends

8 views0 comments

Recent Posts

See All