top of page

का झुरावा जीव वेडा... (भाग २)


सकाळी सेलफोनच्या रिंगटोनने समायराला जाग आली. डिस्प्लेवर तिची असिस्टंट पूजाचं नाव फ्लॅश होत होतं. ‘अरे इतक्या सकाळी कसा कॉल केलाय हिने?’ विचारातच कॉल रिसीव्ह केला समायराने.

“मॅम, आप आ रहे हो ना? वी आर वेटिंग फॉर यू…”

“हाय पूजा, आप लोग इतनी जल्दी कैसे पोहोचे? हम नाईन थर्टी ओ’क्लॉकको मिलनेवाले थे ना?”

“मॅम, इट्स नाईन फोर्टी फाईव्ह नाऊ…”

समायरा उडाली ऐकून! ‘आपण इतका वेळ झोपलोय?’

काल शंतनूचा मेसेज पाहिल्यावर समायरा थोडी डिस्टर्ब झाली होती… तिने फक्त ओके एवढाच रिप्लाय टाकला.. त्यावर इमिजीएटली त्याचा ग्रेट आणि स्माईलिंग इमोटिकॉन असा रिप्लाय.. चार वर्षांनंतर पहिल्यांदाच काहीतरी कम्युनिकेशन झालं होतं त्यांच्यात..


‘त्यावेळेस मी याला नकार दिला होता, ते मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाहीये म्हणून.. अत्यंत शांतपणे याने तेही स्वीकारलं. मध्ये काहीही कॉन्टॅक्ट नाही. आणि चार वर्षांनंतर हा मेसेज करतोय जमलं तर भेटू. त्यावेळचा जाब आता विचारेल का हा? छ्या: मी कशाला घाबरू? आय वॉज व्हेरी क्लिअर दॅट टाईम ऑल्सो. मी त्याला नीट पटवून दिलं होतं.. की मला मुंबईला जाऊन काहीतरी करायचंय, खूप सक्सेसफुल व्हायचंय, मोठं व्हायचंय.. त्याला पटलंही होतं.. होतं ना? की नव्हतं?? तसं फक्त मला दाखवलं होतं त्याने? आणि म्हणूनच त्याने त्या संध्याकाळनंतर मला कॉल किंवा मेसेज केला नाही. त्यानंतर त्या जमिनीच्या डीलचं चालू झालं, मग त्या सगळ्या व्यवहारात मी अडकले.. मला त्याच्याशी मैत्री ठेवायची होती. त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता मला. मुंबईला यायच्या वेळेस एकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण त्याला यातून बाहेर यायला थोडा वेळ हवा होता. मीही त्याच्या या मताचा रिस्पेक्ट करून त्याला पुन्हा कॉन्टॅक्ट केलं नाही, मुंबईत निघून आले.. ऑल दॅट वॉज ओव्हर देअर ओन्ली.. मग आता काय?’


या अशा सगळ्या विचारांत रात्र सरली होती आणि पहाटे समायराचा डोळा लागला होता. ऑफिसचं वर्कलोड आणि त्यात हा इमोशनल स्ट्रेस.. लवकर जाग येणं शक्यच नव्हतं. कधी नव्हे ते समायरा प्रचंड उशीरा ऑफिसला गेली. तिच्या टीमने सकाळी ठरलेलं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन पोस्टपोन केलं होतं. मग दिवसाच्या बाकी सगळ्या शेड्युलची ऍडजस्टमेंट करत दिवस दुपारी सुरू झाला तिचा..

खूप विचार करून मग तिने शंतनू येणार होता मुंबईत तेव्हा त्याला भेटायचं ठरवलं.. ‘तसंही आपण कशाला टेन्शन घ्यायचं? आपलं काहीच चुकलेलं नव्हतं तेव्हा’ असं साधारण वीसेकवेळा मनाशी म्हणून झालं होतं.. २४ ला अनायासे सॅटर्डे होता.. लंच प्लॅन ठरला, प्लेस आणि वेळ दोन्ही ठरलं. समायरा नेहमीच्या सवयीने डॉट साडेअकराला हजर. टेबल रिझर्व्ह केलेलं होतंच.. लॉबीतून आत शिरताना, मागून आवाज आला, “वक्तशीरपणा अजून तसाच आहे तुझा!” आणि तेच खळखळून हसणं!!

समायरा बघत राहिली! चार वर्षं… ‘हा आधीपेक्षाही हँडसम दिसायला लागलाय..! हेअरस्टाईल बदललीय, घड्याळ घालायला लागलाय, किंचित पुट ऑन पण केलंय..’ शंतनूने डोळ्यांसमोर वाजवलेल्या टिचकीच्या आवाजाने दचकली ती आणि आपण असं बघत राहिलेलं त्याने नोटीस केलं म्हणून जरा बावचळलीसुद्धा..


मग जनरल हाय हॅलो होऊन दोघं ठरलेल्या टेबलला येऊन बसले. सूप, स्टार्टर्स, असं सगळं होईपर्यंत अगदीच फॉर्मल बोलणं.. कामाबद्दल वगैरे.. समायरा तर खूपच अवघडलेली होती. बऱ्याचदा तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. एवढी कॉन्फिडेंट असलेली ती साधी साधी उत्तरं देताना अडखळत होती.

आणि अचानक, “ओये मॅडम, समायरा कारखानीसला एवढा ऑकवर्डनेस शोभत नाही हां! कम ऑन यार चियर अप.. लेट ऑल गो.. आपण कॉलेज कँटीनला बसलोय असं समज!”

हे वाक्य ऐकलं मात्र आणि समायरा एकदम रिलॅक्स झाली.. सगळं अवघडलेपण निघून गेलं..

शंतनू एका मोठ्या बिझनेस डीलसाठी मुंबईत आला होता. आणि त्या प्रोजेक्टवर पुढचे सहा महिने तरी त्याला काम करायचं होतं. दादासाहेबांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून मुंबईत घेऊन ठेवलेला फ्लॅट आता उपयोगात येत होता. हे दोघं भेटले त्याच्या पुढल्या आठवड्यात शंतनू चक्क शिफ्टच झाला मुंबईत! कारण काम खूप वाढलं होतं आणि जाऊन येऊन करणं अशक्य झालं होतं..

मग हळूहळू फिल्म्स, डिनर, वन डे आऊटिंग, असं सगळं सुरू झालं. आठवडाभर दोघेही मरणाचे बिझी असायचे. दिवसभरात एखादा मेसेज वगैरे फक्त.. पण विकेन्ड्सचा सॉलिड प्लॅन असायचा. शंतनूच्या निमित्ताने समायराचं ट्रेकिंग पण कन्टीन्यू झालं बऱ्याच काळाने.. दोन महिने होऊन गेले शंतनूला मुंबईत शिफ्ट होऊन..


‘अरे, इतकं सोपं आणि सुंदर असतं का हे कोणाची तरी सोबत असणं, चांगल्या वाईट वेळी कोणीतरी आहे हे फिलिंग इतकं छान असतं? अर्थात शंतनू आहे म्हणून.. दुसरं कोणी असतं त्याच्या जागी तर कुठे असं सोपं झालं असतं?’ समायरा रात्री आडवी झाल्यावर स्वतःशीच विचार करत होती. ‘पण मग असंच सोपं असणार होतं हे आधी का आणि कसं नाही कळलं मला?’ समायरा दचकली. ‘अरे काय विचार करतेय मी? माझं करियर, माझी अँबिशन हे जास्त महत्वाचं आहे.. पण शंतनू कुठे त्यात मध्ये येतोय? उलट तो आल्यावर शेअर करायला कोणीतरी आहे याचा आनंदच झालाय की मला!’ त्या वेळेला कसंबसं त्या विचारांना दडपून समायरा झोपली.. पण त्या विचारांनी काही तिची पाठ सोडली नाही.. जसे दिवस सरकत होते तसा तसा तिला जळी स्थळी शंतनू दिसायला लागला होता! तिच्या घड्याळावर धावणाऱ्या आयुष्याला शंतनूने खूप वेगवेगळी डायमेंशन्स दिली होती!

जवळपास एक महिन्याच्या विचाराअंती तिने शंतनूकडे हा विषय काढायचा असं ठरवलं.. ‘जर कुठे काही असतं ठरलेलं त्याचं तर एव्हाना सांगितलं असतं त्याने नक्की. म्हणजे तसं काही नसणार..’ मनाशी निग्रह करून तिने ठरवलं की या विकेंडला बोलूया नक्की शंतनूशी. माफी मागूया, सॉरी म्हणूया, माझं चुकल्याची कबुली देऊया. तो नक्की समजून घेईल..


दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. विकेंडचा प्लॅन ठरवूया असं म्हणून लंच टाईममध्ये शंतनूला कॉल करायला समायराने सेलफोन हातात घेतला. कॉल लॉगमधून त्याचा नंबर डायल करणार एवढ्यात त्याचाच कॉल आला. ती फारच खुश झाली! क्या टेलिपथी है।

“बोल रे!”

“समायरा ऐक ना, या वीकेंडचं जरा अवघड वाटतंय गं..”

समायरा किंचित अपसेट, “ओह, का रे? वर्किंग क्या?”

“नाही गं.. माँ, बाबा आणि बडे चाचू येतायत परवा सकाळी.. आणि तुला एक गुड न्यूज सांगायचीय.. माझी एंगेजमेंट ठरली…!! इथली मुंबईतलीच मुलगी आहे.. पुढल्या महिन्यात एंगेजमेंट! सो त्याचंच शॉपिंग करायला येतायत.. खरंतर त्यांचं चाललं होतं की तिकडेच करू.. पण मी म्हटलं बिलकुल नाही, इथे मुंबईतच करायचं शॉपिंग! यू नो डियर, आता मला मुंबई एवढी आवडायला लागलीय ना….”

आणि बरंच काय काय बोलत राहिला तो.. पण पुढलं काही समायराला ऐकूच आलं नाही…!!


टू बी कन्टीन्यूड…..


– सुखदा भावे-दाबके


#lovestory #love #couple #friend #friends #heartbreak #friendship

5 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page