का झुरावा जीव वेडा... (भाग ३)

कसंबसं काहीतरी बोलून आणि शंतनूला कॉंग्रॅट्स करून समायराने कॉल डिस्कनेक्ट केला. एकदम तोंडाची चवच गेल्यासारखं झालं तिला.. एव्हाना आपलं प्रेम आहे शंतनूवर याची व्यवस्थित जाणीव झाली होती तिला. पण आता वेळ निघून गेली होती.. शंतनू फार खुश होता फोनवर. आता काही बोलून शंतनूला संकटात टाकायला समायराचं मन तयार नव्हतं. गप्प राहणंच योग्य होतं.
तिने कसेतरी दोन दिवस ढकलले.. आणि नंतरचा वीकेंड एकदम अंगावर आला तिच्या. शंतनू आल्यापासून हा पहिलाच वीकेंड होता ते भेटले नाहीत असा. “हे काय ताई, काढला का परत तो लापटाप? अवो सुटीचा दिवस विसरलायसा काय? आणि शंतनूदादा?” मंदाच्या शेवटच्या प्रश्नात वर्मावर बोट ठेवलं गेलं! तिची बिचारीची काय चूक? ती उलट खुश होती चला ताईंची गाडी हळूहळू लायनीवर येत्ये! तो बिझी आहे गं एवढंच बोलून समायराने विषय बदलला आणि एक प्रेझेंटेशन बनवायला बसली..
मग असंच सायकल चालू राहिलं पुढचे दोन-तीन आठवडे.. वर्किंग डेज पटकन सरकायचे पण वीकेंड जाता जायचा नाही.. एका वीकेंडला शंतनू थोड्या वेळासाठी आला होता घरी. डिनरला जाऊ म्हणत होता. पण समायरानेच काहीतरी कारण काढून टाळलं. शंतनूने थोडा आग्रह करायचा प्रयत्न केला पण नंतर त्यालाच ऑफिसमधून कॉल आला आणि जावं लागलं. नंतरचा वीकेंड पुन्हा एकला चालो रे. समायरा एजन्सीचं काम घरी आणायची पण नुसतीच लॅपटॉपच्या स्क्रीनकडे डोळे लावून बसायची.. बरं, मागच्या वेळेस जवळच्या मैत्रिणींची तोंडं अतिशय मुद्देसूद बोलून तिनेच बंद केली होती. आता कोणत्या तोंडाने त्यांना हे सांगायचं की मी शंतनूच्या प्रेमात पडलेय आणि तो दुसऱ्या कोणाशीतरी एंगेजमेंट करतोय! ऑफिसमध्ये सगळ्यांशी मुद्दाम जेवढ्यास तेवढंच रिलेशन ठेवलेलं. मुंबईत एकटीच राहते, तसं कोणी नातेवाईक नाही, कशाला हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचू द्या.. अगदीच एकटी पडली ती! समायरा तशी कोसळून पडणारी, दिवसरात्र रडून काढणारी वगैरे नव्हती. ती हे सगळं फार स्किलफुली हँडल करत होती, पण स्वतःच्या नकळत आतून खचत चालली होती!
आणि अशातच एका शनिवारी सकाळी सकाळी शंतनूचा कॉल, “मॅडम, उद्या सकाळी १० वाजता तुला पिकअप करायला येतोय. थोडंफार शॉपिंग करायचंय. आणि तुझ्यासाठीही काहीतरी घ्यायचंय.. एंगेजमेंट आली जवळ अगं. चल चल ठेवतो आता.. उद्या शार्प वेळेत तयार राहा, मी येतो!” कॉल डिस्कनेक्ट! समायरा काय म्हणते ऐकायला थांबलाच नाही तो. प्रचंड डिस्टर्ब झाली ती. ‘मी कशीबशी मॅनेज करतेय स्वतःला यातून आणि आता याच्याचबरोबर याच्याच एंगेजमेंट साठी शॉपिंग करायला जायचं?’ काय करावं कळेना तिला.. ऑलमोस्ट रडायला येणार इतक्यात डोअर बेल वाजली. दार उघडून बघते तर तिची कॉलेजची मैत्रीण रुची.. सॅम करून गळ्यातच पडली. समायराला स्वतःला आनंद झालाय की नाही हेच कळेना! रुची धाडकन आत शिरली. एक छोटी बॅग होती हातात आणि पर्स.. समायराने तिला पाणी दिलं. रुचीने घडाघडा सांगून टाकलं की कशी ती काल एका मिटिंगसाठी मुंबईत आली होती, मग काल तिच्या मुंबईतल्या मावशीकडे राहून जीवाची मुंबई करायला समायराकडे आली.. समायरा जेमतेम हाय हॅलो करून जुजबी चौकशी करू शकली. रुचीला अंदाज आलाच काहीतरी बिनसल्याचा. एकेकाळच्या अतिशय घट्ट घट्ट मैत्रिणी होत्या त्या. चेहऱ्यावरून कळायचं मनात काय चाललंय!
रुची खुर्चीतून उठली आणि समायराच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली. समायराचा हात हातात धरून हलका दाबला आणि समायराच्या सेल्फ मॅनेजमेंटचा पार बोऱ्या वाजला! ओक्साबोक्षी रडत सगळं सगळं सांगून टाकलं तिने रुचीला!
टू बी कन्टीन्यूड… (क्रमशः)
– सुखदा भावे-दाबके
#lovestory #couple #love #friend #friends #friendship #heartbreak #story