का झुरावा जीव वेडा... (भाग ४)

रुचीने समायराला मनसोक्त रडू दिलं. अशी मोकळी ती याआधी कधीच झाली नव्हती.. तिचा भर ओसरेपर्यंत रुची शांत बसून राहिली. जरा वेळाने समायरा रडायची थांबली. चेहऱ्यावर पाणी मारून आली. हलकं वाटत होतं तिला.. बऱ्यापैकी सावरली.. हे सगळं होईपर्यंत रुचीने समायराला आवडते तशी कडक कॉफी बनवली. कॉलेजमध्ये असतानासुद्धा रुची घरी आली की समायरा तिला आग्रह करायची कॉफी करायचा. कॉफीचे मग्ज घेऊन दोघी बाल्कनीत आल्या.
इथे समायराला फार रिलॅक्स वाटायचं. ऑफिसचं वर्कलोड, डेडलाईनचं टेन्शन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी घालवलेले तासंतास, या सगळ्याने थकली की ती कायम कडक कॉफी बनवून घेऊन इथे येऊन उभी राहायची. नवव्या मजल्यावरच्या या बाल्कनीतला सुसाट वारा, आणि आवडीची कडवट कॉफी.. एका सिपमध्ये फ्रेश व्हायची एकदम!
"सॅम, सांगायचं राहिलं मगाशी, तुझं घर खूप छान आहे हां!" रुचीच्या वाक्याने समायराची तंद्री मोडली. "अगं शोधलंस कसं इतकं चांगलं घर?" रुची विचारत होती. समायराने फक्त एजंट जिंदाबाद एवढंच उत्तर दिलं. "आणि इंटिरियर सगळं तुझ्या चॉईसचं ना अर्थात?" या प्रश्नावर मात्र समायराच्या चेहऱ्यावर छोट्टंसं स्माईल आलं! मुळात इंटिरियर हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय आणि इथे तर तिच्या स्वतःच्या घराचं इंटिरियर... समायराने मग एकेक करत त्यावेळच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. आपोआप कळी खुलली तिची. मग एजन्सीबद्दल, कसं तिने स्वतःला प्रूव्ह केलं वेळोवेळी, महत्वाची प्रोजेक्ट्स, एजन्सी आणि तिची स्वतःची प्रगती असं सगळं सांगत नेमकी शंतनूच्या एन्ट्रीपाशी येऊन थबकली! पुन्हा डिस्टर्ब होणार इतक्यात रुचीने विषय बदलला, "चल सॅम, बाहेर जाऊया कुठेतरी. तशीही भूक पण लागेल आता थोड्यावेळात. शिवाय ऑफिसचं एक पार्सल मला पर्सनली हॅण्डओव्हर करायचंय एका महत्वाच्या ठिकाणी." पत्ता समायराच्या ओळखीचा होता. मग आवरून निघाल्या दोघी.
पार्सल हॅण्डओव्हर करून झालं, बकाबका हादडून झालं, मग ते हादडलेलं पचवण्यासाठी म्हणून वॉक घ्यायला दुक्कल निघाली. रुचीची अखंड बडबड चालूच होती. साधारण १२-१५ दिवसांत बोलायला न मिळालेला माणूस अचानक बोलायला मिळाल्यावर जसा घडाघडा बोलेल, तशी ती २४×७ बोलू शकायची.. अर्धा पाऊण तास रपेट झाली. मग रुचीचे पाय दुखायला लागले आणि समोरचं एक कॅफे मंदिरासम मानून तिने त्या दिशेकडे धाव घेतली. चिल्ड फ्रॅपे घशाखाली घालून मग एका फिल्मला जाऊन, थोडंसं शॉपिंग करून मगच दोघी घरी आल्या. फार दिवसांनी समायराचा वीकेंड असा स्पेन्ड होत होता.. घरी येऊन नूडल्स करून खाल्ले.. आणि पूर्वीसारख्या चक्क जमिनीवर गालिचा घालून आडव्या झाल्या.. हळूच रुचीने पुन्हा विषय काढला..
"सॅम, तू अशी प्रेमात पडून रडशील वगैरे असं कधीच वाटलं नव्हतं गं मला!" समायराने तिच्याकडे बघितलं, "रुच, कारण मी कधी प्रेमातच पडले नव्हते! कायम दूर पळत आले.. मला वाटायचं की मी एकटी, माझी स्वप्नं फार मोठी, महत्वाकांक्षा उंच.. प्रेमासोबत हे सगळं कसं काय मॅनेज होणार? का कुणास ठाऊक पण फार ऑड विचार बनले होते माझे प्रेमाबद्दल.. पण शंतनू आला आणि आपोआप झालं बघ सगळं मॅनेज! मला वेगळं काहीच करायला लागलं नाही.. इतकं सहज सोपं असेल हे सगळं असं वाटलंच नव्हतं मला कधी! शंतनूने ना काहीतरी जादूची छडी फिरवल्यासारखं वाटत होतं मला.. सगळं जगच बदलून गेलंय रुच माझं! इतकं मस्त आहे हे सगळं.. आणि मी मोस्ट अनफॉर्च्युनेट गर्ल असेन की काही वर्षांपूर्वी अशा मुलाला नाही म्हणून बसले! आता सगळं संपलंय गं.. मला वाटायचं मी इतकी प्रॅक्टिकल, कम्पोझ्ड आहे, मी हे ही हँडल करू शकेन.. आणि करतही होते गं! पण आज अचानक शंतनूचा असा कॉल आला शॉपिंगला जाण्याचा आणि सेन्सेस बंद झाल्यासारखे वाटले! नाही सुचत आता काय करायचं ते! एकदा वाटतंय सगळं सांगून टाकूया त्याला उद्या जाऊन. मग वाटतंय नको, उद्या जाऊयाच नको.. तसंही त्याच्या एंगेजमेंटचं शॉपिंग करताना प्रचंड जड जाणारे मला. येस करेक्ट आहे मी जातच नाही उद्या! काहीतरी कारण सांगते त्याला.."
रुचीने शांतपणे ऐकून घेतलं तिचं सगळं.. मग थंडपणे म्हणाली, "सॅम, मला वाटतं तू विसरून जा शंतनूला आता.. उद्याही नको जाऊस आणि आता त्याला भेटू किंवा बोलूही नकोस! येत नाहीस असा एक मेसेज टाकून दे त्याला!"
समायराने दचकून रुचीकडे बघितलं! रुची एकटक तिच्याचकडे बघत होती...!!
टू बी कन्टीन्यूड... (क्रमशः)
- सुखदा भावे-दाबके
#coffee #froiends #girls #girlsdayout #lovestory #couple #heartbreak #twist #coffeeshop #film