top of page

का झुरावा जीव वेडा... (भाग ५)


रुचीकडे बघता बघता समायराच्या डोळ्यांतून झरकन पाणी खाली आलं.. "काय बोलतेयस रुच? मला माहितीय मला शंतनू मिळणार नाहीये पण असं तडकाफडकी त्याला तोडून टाकणं मला नाही जमणार गं!" रुचीच्या चेहऱ्यावर एक मंद स्माईल... समायराने कन्टीन्यू केलं, "अगं इतका चांगलाय तो, त्याला कितीतरी काळ कळणारच नाही मी असं का केलं.. उगीच स्वतःचं काहीतरी चुकलं म्हणून स्वतःलाच दोष देत राहील! नाही मी त्याला असं तोडून नाही टाकणार एकदम!" समायराने डिक्लेअर करून टाकलं.. रुची शांतपणे उठून बसली आणि म्हणाली, "वेडाबाई, मी मुद्दाम म्हटलं तसं.. मला तुझी रिऍक्शन काय येते बघायचं होतं. सॉरी बाळा तुला त्रास दिला!" समायरा डोळे पुसता पुसता हसली! "नो प्रॉब्लेम डियर, तू माझी कोणतीही परीक्षा घेऊ शकतेस! तुला तो हक्क आहे!!" रुचीने पटकन नजर दुसरीकडे वळवली.. आणि मग कॉफी आणते छान म्हणून उठूनच गेली किचनमध्ये..


त्यानंतर मग कॉफी, जनरल कॉलेजच्या आठवणी, एकमेकींची ऑफिसेस अशा गप्पा चालू राहिल्या आणि मग डोळा लागला रुचीचा.. समायरा रात्रभर विचारात तळमळत होती. जावं की नाही याबद्दल अनेकवेळा डिसीजन फायनल केला आणि थोड्यावेळाने पुन्हा बदलला. नंतर अचानक तिच्या मनात तीन चार महिन्यांपूर्वी नाकारलेल्या बँगलोरच्या एका प्रोजेक्टचा विचार आला. तिच्या कॅलिबरचं न वाटल्याने तिने ते प्रोजेक्ट दुसऱ्या लीडरला रिडायरेक्ट केलं होतं. आता मात्र तिला वाटायला लागलं की एकदा रिक्वेस्ट करून बघूया त्या लीडरला प्रोजेक्ट एक्सचेंज करण्याबद्दल.. त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने एखाद वर्षं बँगलोरला राहता येईल, या सगळ्यांपासून लांब. कारण शंतनू मोस्टली मुंबईत सेटल होणार आता, याचा समायराला पूर्ण अंदाज होता.. हा विचार करून झाल्यावर तिला जरा बरं वाटलं की किमान थोडंतरी बेटर होईल अगदीच इथे असण्यापेक्षा..


सकाळी रुचीला जाग आली तेव्हा समायरा ऑलमोस्ट तयार झाली होती.. "सॅम, जात्येस?" रुची थोडीशी आश्चर्यचकित.. "हो जात्ये! पूर्वी एकदा त्याच्या दुःखाचं कारण बनले होते. आता आनंदाचं कारण नाही तरी त्याच्या आनंदात सहभागी व्हायचा प्रयत्न तरी करते!" रुचीला मैत्रिणीचं फार कौतुक वाटलं. "सॅम, तू प्रचंड प्रेमात आहेस! पहिल्यांदाच तुला दुसऱ्या कोणाचा तरी एवढा विचार करताना पाहत्ये मी..!" तेवढ्यात डोअर बेल वाजली. समायराने जाऊन दार उघडलं. शंतनू दारात उभा..!! "अरे, लवकर आलास तू?" समायरा एकदम गडबडली. खरं तर तिने मुद्दाम लवकर आवरून ठेवलं होतं.. तो येईपर्यंत मनाची तयारी झाली असती थोडी. पण हा इतक्या लवकर आला त्यामुळे बावचळली ती.. "ओये मॅडम, आत घेणारात की नाही मला की इथेच खांब बनवून ठेवणार?" त्याचा आवाज ऐकून रुची समोर आली "अरे, शंतनू काय म्हणतोयस? कितो वर्षांनी? ये ये आत ये प्लीज" "ओहो रुची! तू कधी आलीस? बरं झालं तू तरी आत बोलावत्येस नाहीतर समायरा काही मला घरात घेणार नव्हती बहुतेक" जोरजोरात हसत आत येत शंतनू म्हणाला.. "रुची आता तू आवर पटकन. तू ही येत्येस आमच्याबरोबर.. चलो चलो, तयार हो पटकन.." त्याने फर्मानच सोडलं. रुचीने त्याला सांगायचा प्रयत्न केला पण शंतनूने काहीही ऐकलं नाही. शेवटी तिला तयार होऊन यावंच लागलं..


शंतनूची नवी कोरी स्पोर्ट्स कार या तिघांना घेऊन भरधाव वेगाने निघाली.. साधारण पाच मिनिटं झाल्यावर शंतनूने म्युझिक प्लेयर बंद केला. "समायरा, रुची, तुम्हां दोघींना प्लॅनमधला एक चेंज मी सांगितला नाहीये. छोटासाच आहे.. म्हणजे... आपण.... आपण पुण्याला जातोय!!" "व्हॉट????" समायरा ऑलमोस्ट किंचाळली, "अरे, असा काय? असे अचानक पुण्याला? इथे शॉपिंग करणार होतो ना आपण?" रुचीही वैतागली, "अरे मग बॅगच घेऊन निघाले असते मी!!" "अगं ए, काय बोलतेयस? ऐक ना जरा माझं.. सॉरी समायरा, खूप इलेवंथ अवरला चेंज झाला गं हा.. व्हेरी सॉरी. पण अगं तिकडच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि दादा, बाबा, बडे चाचू सगळे आऊट ऑफ टाऊन आहेत. त्यांना पोचायला किमान एक दिवस लागेल. खूप थोड्या वेळेचं काम आहे पण खूप इम्पॉर्टन्ट आहे सो आमच्यापैकी कोणाचीतरी गरज लागणारे सो मी तुला न विचारता केला चेंज.. आणि म्हणून तर एवढा लवकर आलो ना.. आणि ते अक्षरशः पाच मिनिटांचं काम आहे ते झालं की आपण आपल्या प्लॅनला मोकळे.. व्हेरी सॉरी समायरा!" समायरा स्पीचलेस होती. प्रचंड राग आला होता तिला शंतनूचा.. "शंतनू तू मला असं गृहीत धरायला नको होतंस!" एवढंच बोलू शकली ती आणि खिडकीतून बाहेर बघायला लागली. शंतनूने मागे रुचीकडे पाहिलं, तिने शांत राहायची खूण केली. आणि मी बघते अशी लिप मूव्हमेंट केली.. गाडीत एकदम शांतता पसरली..


कुठेही ब्रेक न घेता सव्वा दोन तासांत शंतनूने गाडी पुण्यात आणली तेव्हा समायरा बॅकरेस्टला डोकं टेकवून शांतपणे झोपली होती. त्याने एका आलिशान बिल्डिंगसमोर गाडी आणून उभी केली.. आणि हलकेच समायराला हाक मारली, "समायरा.. समायरा... पोचलोय आपण आमच्या नवीन ऑफिसला. तू जागी हो, माणसांत ये, तोवर मी इन्स्ट्रक्शन्स देऊन आलोच कलीग्जना माझ्या.. ओन्ली फाईव्ह मिनिट्स!" इतकं बोलून तो उतरून गेलासुद्धा.. समायराने मागे बघितलं, रुचीही गाढ झोपली होती, तिला तर गाडी थांबलेलीही कळली नव्हती! 'अरे हिची झोप आहे का भंकस!' स्वतःशीच पुटपुटत समायराने आजूबाजूला पाहिलं. जसजसं तिला आकलन होत गेलं आपण कुठे आहोत तशी अंतर्बाह्य हलली ती! गडबडत सीट बेल्ट काढत तिने मागे वळून रुचीला जोरजोरात हलवली.. "रुच उठ, लवकर उठ, बघ काय झालंय!" बिचारी रुची दचकून जागी झाली एकदम.. "रुच, शंतनू या समोरच्या ऑफिसमध्ये गेलाय जे त्याचं नवीन ऑफिस आहे, आणि आपण आत्ता त्या हॉटेलच्या पुढ्यात आहोत जिथे शंतनूने मला प्रपोज केलं होतं! हे डावीकडचं.. अगं असं कसं? शंतनू विसरला का ही जागा? त्याने या हॉटेलच्या एवढ्या जवळ कसं ऑफिस घेतलं?" समायराचे प्रश्न संपतच नव्हते शेवटी रुचीने तिला मध्येच गप्प केली कशीबशी..


तेवढ्यात समायराचा मोबाईल वाजला.. स्क्रीनवर शंतनूचं नाव फ्लॅश होत होतं. मनस्वी संताप झाला समायराचा.. 'आता हा सांगणार मला वेळ लागेल तुम्ही आत या ऑफिसला प्लीज. मग किती वेळ जाईल सांगता येत नाही.. शी: उगीच तयार झालो शंतनूसोबत यायला' वैतागलेल्या स्वरात तिने हॅलो केलं.. "समायरा, मी काय सांगतोय ऐक, तुझ्या डावीकडच्या बिल्डिंगमधून आत ये.. समोर रिसेप्शन आहे.. आणि.." समायराने तोडलं त्याला, "अरे तू ऑफिसमध्ये गेलायस ना, मग हे.." त्यानेही तोडलं, "प्रश्न विचारू नकोस. जे सांगतोय ते ऐक आणि तसं कर.. ये रिसेप्शनला!" दोघीजणी उतरल्या गाडीतून, रिसेप्शनला पोचल्यावर एक सफारीमधला माणूस त्यांची वाट बघत असल्यासारखा, 'समायरा मॅम?' असं विचारत समोर आला. त्याला हो सांगितल्यावर 'प्लीज कम धिस वे मॅम' असं म्हणून तो चालायला लागला. त्याला फॉलो करत दोघीजणी एका लाऊंजमध्ये जाऊन पोचल्या. आणि समायरा स्पेल बाऊंड झाली!


तेच लाऊंज, तसेच म्युझिशियन्स, तशीच रोमँटिक ट्यून, तीच चेअर अरेंजमेंट, तीच कलर थीम, तसाच केक टेबलवर! केकवर लिहिलेलं, 'फॉर यू, समा!' शंतनूने केलेला खास शॉर्टफॉर्म समायराच्या नावाचा! टेबलच्या पलीकडे अचानक एक मंद स्पॉटलाईट आला.. पलीकडून त्यात शंतनू चालत आला.. "समायरा कारखानीस, हा शंतनू यज्ञोपवीत नावाचा वेडा माणूस तुमच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे! त्याला तुमच्याशिवाय काहीही दिसत नाही.. घर, ऑफिस, जिम, कुठेही त्याला तुमचाच चेहरा दिसत राहतो! आणि त्याच्या वेडावरचा एकच उपाय आहे!" हळूहळू शंतनू तिच्यापर्यंत पोचला.. आणि गुडघे जमिनीवर टेकून हातातली रिंग तिच्यापुढे धरत त्याने प्रश्न केला, "समा, विल यू मॅरी मी?" समायराला स्वप्न बघत्ये की सत्य तेच कळेना!! "शं..." तिला बोलताच आलं नाही काही.. समोरून शंतनू पुन्हा विचारतोय, "विल यू मॅरी मी समा?" समायराच्या मागे रुची उभी होती. समायराने रुचीकडे पाहिलं.. वेल डन अशी खूण ती शंतनूला करत होती.. समायराला काय घडलं याचा अंदाज आला. तिने समोर बघितलं.. तिला अचानक शंतनूचा चेहरा धूसर दिसायला लागला.. नंतर जाणवलं तिचेच डोळे भरून आले होते.. "समा, बोल ना काहीतरी.. माझे गुडघे दुखायला लागलेत गं!" समायराने नजरेनेच हो म्हणत हात पुढे केला.. शंतनूने रिंग तिच्या बोटात घातली आणि उभा राहिला.. खिशातून रुमाल काढून त्याने समायराचे डोळे पुसले आणि तिच्या आश्चर्यचकित नजरेत आपली खोडकर नजर मिसळून टाकली!


समाप्त! (की एक नवी हॅपी सुरुवात!!)


- सुखदा भावे-दाबके


#lovestory #love #couple #friends #friendship #boy #girl #romance #happyending

5 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page