काल रात्री चांदण्यात...

काल रात्री चांदण्यात
चाळताना तुझी वही
क्षण होते मंतरलेले
मनी सुरेल शहनाई.
एक एक भावनांची
सखे रचलीस आरास
कोण आहे उभा दूर
वाट बघत दारात.
तुझे शब्द तुझे मौन
सारे होते गं बेधुंद
जशी धुक्यात डोकावे
एक अनामिक वाट.
पान पान चाळताना
उठला अनाम काहूर
उल्कापात झाल्याविना
नभ लखाखे आतुर.
एक नक्षत्र बाजूला
पडलेसे भासलेले
एक पाकळी अल्लड
देई क्षणांचे दाखले.
क्षण क्षण वाचताना
मंद दरवळ प्राजक्त
वर नितळ चांदणे
ओठी हलकीशी शीळ.
- पराग दाबके
हे गाणं खालील लिंकवर उपलब्ध आहे -
https://youtu.be/ElucxaXFIpI