किती उद्याच्या निष्पन्नाची धांदल

किती उद्याच्या निष्पन्नाची धांदल
दिवस आजचा अजून सरला नाही
रंग किनाऱ्यावरल्या आयुष्याचा
पाण्यामध्ये जरा उतरला नाही
चाकोरीच्या पल्याड कैसे असते
विचारसुद्धा मनात शिरला नाही
इथेच इथल्या खेळाचा हिशोब
बाकीलाही आकडा उरला नाही
कुठून जाते आयुष्याची त्रिज्या
परीघ कैसा तिलाच पुरला नाही
उण्यापुऱ्या या अस्तित्वाचा गोंधळ
लोळ धुक्याचा मनात विरला नाही
मला दिली मी नजरकैद अदृश्य
श्वास जरासाही किरकिरला नाही
सफेद कॉलर दुडून आतून कोणी
कली किंवा कान्हा अवतरला नाही
© सुखदा भावे-दाबके