मला म्युझिक डायरेक्टर बनायचंय..!! (भाग १)

संगीतक्षेत्रात थोडंफार काम करायला सुरुवात केल्यापासून दर महिन्याला साधारण दोन-तीन फोन कॉल्स असे ठरलेले असतात, की ज्यामुळे मनोरंजन, काळजी, वैताग, मनस्ताप असे सगळे प्रकार एकाच वेळेला अनुभवायला मिळतात!
कोणीतरी संगीताची प्रचंड आवड असलेलं व्यक्तिमत्व असतं आणि त्याला डायरेक्ट 'म्युझिक डायरेक्टर' बनायचं असतं...!!
(आवाजावरून साधारण २२-२५च्या आसपास वय असावं)
माझा पहिला प्रश्न, "अरे वा, छान. म्युझिकची काय बॅकग्राऊंड आहे तुमची?"
प्रश्न समजतच नाही. "म्युझिकची बॅकग्राऊंड म्हणजे?"
अरे देवा..! मग मी प्रश्न थोडा सोपा करून विचारते. "म्हणजे काय शिकलायत? गाणं किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट?"
उत्तर, "हां मला गायला येतं ना.."
मी(मनात) - हुश्श! (पण माझा हा आनंद मुळीच टिकत नाही.)
लगेच समोरून, "म्हणजे मी क्लास नाही लावलाय पण टीव्ही वरून बघून बघून गातो."
अरे...! टीव्ही वरून बघून करायला ती काय रेसिपी आहे का? परमेश्वरा, याला माफ कर..
मुळात गाणं ही बघण्याची नसून ऐकण्याची कला आहे, इथेच बेसिक झोल असलेल्या आणि आवाजावरून अतिशय सिन्सियर वाटणाऱ्या त्या इसमाशी मी माझं डोकं शांत ठेवत बोलायचा प्रयत्न करू लागते.
मी - "नाही तसं नसतं. संगीताचं शिक्षण हे तुम्हांला कोणत्यातरी गुरुकडे जाऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने घ्यावं लागतं. सा रे ग म...."
माझं बोलणं मध्येच तोडत, "नाही मॅडम ते.. शिकण्यात आणि नुसतंच वाजवण्यात इंटरेस्ट नाहीये मला.. मला ना फिल्म साँग्स बनवायचीयत!"
मला मोबाईल विकत घेतल्याचाच पश्चात्ताप व्हायची वेळ आलेली असते.
मी (तरीही संयमाने) - "हो मान्य आहे. पण फिल्मच्या गाण्यांमध्ये पण सा रे ग म असतंच. सा रे ग म शिवाय कोणतंच संगीत नाहीये जगात."
"हो मॅडम, पण ते न शिकताच मला चाली सुचतात ना."
"अरे वा (मनात अरे बापरे) मग चांगलं आहे. किती गाणी केलीयत तुम्ही अशी?"
"हां भरपूर केलीयत गाणी मॅडम.. मला ना लिरिक्स बघितल्या बघितल्या चाल सुचते."
(आयुष्यात एकदा तरी हा प्रकार जमावा हे माझं स्वप्न)
त्या समोरच्या इसमाचं हे वाक्य ऐकून मला भयंकर कॉम्प्लेक्स आल्यासारखं होतं. मग मी स्वतःची समजूत घालते कि अगं असते एखाद्याला दैवी देणगी. आणि त्या व्यक्तीला दोन चार कंपोझिशन्स मला पाठवायला सांगते..
...क्रमशः
- सुखदा भावे-दाबके
#musicdirector #musiccomposer #composer #musician #music #musicislife #composing