top of page

मला म्युझिक डायरेक्टर बनायचंय..!! (भाग २)


ठरल्याप्रमाणे त्या इसमाने मला गाणी पाठवली. ईमेल ओपन करून बघितला तर सात गाणी आली होती! अरे, एवढी कशाला? मी काय अल्बम काढणारे का त्याच्या गाण्यांचा? त्याचा मेसेज आलेलाच होता, मॅडम गाणी ऐकली का? मी रिप्लाय केला कि जस्ट गाणी डाऊनलोड करतेय मी. ऐकली की कळवेन. पुढचे चार दिवस थोडी बिझी आहे. त्यानंतर ऐकेन.

त्या चार दिवसांत दोन कॉल्स आणि त्यानंतरच्या चार दिवसांत रोज एक कॉल! तिथेच डोकं सटकलं होतं. पण म्हटलं असेल थोडा इंपेशण्ट. एकदम तोडून नको टाकायला. ऐकून बघूया आधी एकदा गाणी आणि मग बोलू.

गाणी ऐकली.

कोणाच्या निर्मितीबद्दल, कलेबद्दल वाईट बोलू नये पण गाणी अतिशय बंडल होती.

शब्द आणि चालीचा काही संबंध नाही, प्रत्येक गाणं एखाद्या प्रचंड फेमस गाण्याशी प्रचंड वगैरे साधर्म्य असणारं, शब्दांचं व्याकरण सांभाळलेलं नाही, एक दोन ठिकाणी चाल नक्की काय आहे तेच कळत नव्हतं. 

बरं म्हणावं असा एकही मुद्दा सापडेचना.

अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी आलाच त्याचा कॉल. स्पष्ट बोलूया असं ठरवूनच रिसीव्ह केला.

"मॅडम, ऐकली का गाणी?" मी, "हो ऐकली. बरीच पाठवलीयत. दोन तीन पाठवली असती तरी चाललं असतं."

"नाही हो मॅडम, ही सात जी पाठवलीयत ना, ही माझी सगळ्यांत बेस्ट गाणी आहेत." (हरे राम!)

माझे शब्द अपुरेच पडत होते यावर तेवढ्यात त्यानेच कोंडी सोडवली माझी.

"मॅडम, तुम्हांला तुमच्या प्रोजेक्ट्स मध्ये यातली गाणी घेऊ शकता हां का तुम्ही. आपल्याला काय प्रॉब्लेम नाही."

नशीब मी ऑलरेडी चेअरवर बसलेलीच होते, उभी असते तर पडले असते बहुतेक.

"मॅडम ते तुम्ही बघा तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये यातली गाणी घ्यायचं, बाकी राईट्सचं वगैरे बघून घेऊ आपण. नाव नसलं आपलं तरी चालेल तुम्ही तुमच्या नावाने वापरा आणि ते पेमेंटचा शेअर ठरवू आपण."

आता पाणी डोक्यावरून गेलं होतं. याला उत्तर देणं आणि मुळात त्याला शिकण्याची गरज आहे याची जाणीव करून देणं भाग होतं.

मी - "हे बघा, एक तर मी अशी दुसऱ्यांची गाणी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये वापरत नाही. माझी गाणी मी स्वतः कंपोझ करते. दुसरं म्हणजे तुम्ही जी कंपोझिशन्स पाठवलीयत ती अतिशय बेसिक आहेत. त्यात ओरिजिनॅलिटी नाहीये."

"असं कसं म्हणता मॅडम? मी स्वतः ती कंपोझ केलीयत."

मी - "बरोबर आहे तुमचं, तुम्ही स्वतः ती केलीयत कंपोझ पण त्या सगळ्या चाली चोरलेल्या वाटतायत आणि शब्द आणि चालीचा काही संबंध नाहीये. आणि ती ज्याच्या कोणाच्या आवाजात तुम्ही करून घेतलीयत ना, त्याला चाली कळलेल्याही नाहीयेत नीट"

"अहो मॅडम मीच गायल्या आहेत त्या."

"म्हणूनच मी तुम्हांला म्हणत होते शास्त्रशुद्ध शिक्षण महत्वाचं असतं. शब्दांच्या फीलनुसार इमोशन चालीत आणण्यासाठी वेगवेगळ्या रागांची, स्केल्सची ओळख असणं गरजेचं असतं. काव्याचा थोडा अभ्यास करणं गरजेचं असतं.तरच ती इमोशन तुम्ही तुमच्या कंपोझिशनमध्ये आणू शकता. एखाद दोन वेळेस नशीबाने चांगली चाल तयार होईलही पण पुढच्या वेळेस तुमच्याजवळचं मटेरियल कमी पडेल ज्याचा उपयोग तुम्ही करू शकला असतात कंपोझ करण्यासाठी. पण तुम्हांला तर न शिकताच डायरेक्ट म्युझिक डायरेक्टर बनायचंय ना. काय करणार, अशीच अवस्था होणार तुमच्या गाण्यांची"

झेपलंच नसावं बहुतेक. "हां मॅडम, मी बघतो ते शिकण्याचं. बरं ठेवू मग? सॉरी हां तुम्हांला त्रास दिला. आणि तुम्हांला कधी कंपोझिशन्स हवी असतील तर सांगा हां माझी"

परमेश्वरा! एवढं करूनही काडीचाही फरक पडला नव्हता!!

काय बोलणार यावर अजून, मी सरळ कॉल डिस्कनेक्ट केला. तो आणि त्याचं नशीब बघून घेतील. दुसरं काय?


- सुखदा भावे-दाबके


#music #musicdirector #musiccomposer #musician #musicislife #composer #composing

14 views0 comments
bottom of page