top of page

निर्धास्त…!


माझ्या कामाचं शेड्युल कधी कधी थोडं विचित्र असतं, टायमिंग्स ऑड असतात.. रेकॉर्डिंग, मिक्सिंग असलं की किंवा नाटकाच्या तालमी असल्या की घरी पोचायला उशीर होतो.. मी खूप लकी आहे की माझ्या घरून मला खूप चांगला सपोर्ट आहे.. उशीर झाला की माझा नवरा कायम मला आणायला येतो.. शिवाय आत्तापर्यंत मला टीम मेंबर्सपण खूप चांगले मिळालेत.. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा कोणीतरी घरी सोडतं खूप उशीर झाला की.. अगदी नाही तर मी व्यवस्थित घरी पोचेन अशी रिक्षा, कॅब यांची सोय करून देतात.. पण कधी तरी असं होतंच की एकटीने घरी जायची वेळ येते..एकदा अशीच एक मिक्सिंगचं काम संपवून घरी जायला निघाले.. डोंबिवलीमध्येच असल्याने स्कुटी घेऊन गेले होते स्टुडियोत.. साधारण सव्वाबारा वाजले रात्रीचे मला निघायला. स्टुडियो ते घर दहाच मिनिटांचं अंतर आणि स्कुटी असल्याने म्हटलं जाईन एकटी आरामात.. अर्धं अंतर पार करून गेले.. शिवमंदिर रोडवर पोचले होते. तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक येत होता आणि त्याचा कार्बोरेटर मेजर गंडलेला असल्याने भयंकर धूर सोडत होता.. मला थोडासा खोकला झाला होता.. आणि स्कार्फ विसरले होते.. म्हणून म्हटलं एका बाजूला थांबू जरा तो ट्रक जाईपर्यंत.. स्कुटी रस्त्याच्या साईडला घेतली आणि खिशातून रुमाल काढून नाकावर धरून थांबून राहिले.. ट्रक समोरून येऊन मागे निघून गेला.. आता मी स्कुटी सुरू करून निघणार एवढ्यात मागून एक बाईक आली..बाईक माझ्या अगदी बाजूला येऊन थांबली! क्षणभर ठोका चुकला पण बघितलं तर पोलिसांची बुलेट होती.. वर दोन इन्स्पेक्टर्स होते..


“काही प्रॉब्लेम आहे का? इथे का थांबलायत?”

“नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये..”

“यावेळेला इथे थांबलायत म्हणून विचारलं”

मग मी सगळे डिटेल्स सांगितले की मी काय करते, माझं नाव, मी आत्ता इथे कशी आणि रस्त्यात साईडला का थांबलेय.. मी वाट बघत होते की आता काय म्हणतायत.. बरं, बोलू नये पण हल्ली कोण कोणत्या वेशात समोर उभं ठाकेल सांगता येत नाही.. सो ती पण एक धास्ती होतीच.. पण समोरून जे वाक्य आलं त्यावर के बोलावं तेच कळेना..!!”ताई, जा तू आता लगेच घरी.. सोडायला येऊ का? म्हणजे तू चल पुढे आम्ही मागून येतो तुझ्या.. तुझ्या घरापर्यंत येऊन मागे फिरू आम्ही.. बाकी काही नाही, काळजी वाटते.. जमाना चांगला राहिलेला नाही. पण आम्ही आमच्याकडून जमेल ते सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आम्ही सगळीकडे पुरे पडत नाही हाच प्रॉब्लेम आहे..!”

“नको नको सर, मी जाईन. मला सवय आहे अशा वेळेस या रस्त्याने जायची”

“नक्की? संकोच करू नकोस. आम्हांला यायला काहीच प्रॉब्लेम नाही. रादर आमचं कामच आहे ते..”

“थँक्यू सो मच. पण मी खरंच जाईन एकटी..”

“ठिके, सावकाश जा.. तसा सेफ एरिया आहे हा. काही प्रॉब्लेम नाही”मग मी तिथून निघाले. ते वळण पार करून जाईपर्यंत ती बुलेट तिथेच थांबलेली वळताना बघितली मी!


खरंच, मला फार छान वाटत होतं! अशी माणसं सगळ्याजणींना सगळीकडे भेटली तर किती बरं होईल! नाईलाजाने का होईना, उशिरा प्रवास करायला लागणाऱ्या सगळ्याजणी अतिशय निर्धास्त मनाने जातील.. हे असं खरंच सगळीकडे होऊदे अशीच प्रार्थना देवाकडे करत मी घरी पोचले आणि नवऱ्याला हा प्रसंग सांगायला सुरुवात केली..!!


- सुखदा भावे-दाबके


#girl #girls #woman #women #womensafety #police #salute

11 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page