top of page

ऑनलाईन कार्यक्रमांचं तंत्र आणि नवीन माध्यमांची गरज | सांगतोय आदित्य बिवलकर


लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर इतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच कलाक्षेत्रातही सगळं ठप्प झालं. अनेक कार्यक्रम कॅन्सल झाले, स्टुडियोज बंद केले गेले. त्यातूनही बाकीच्यांप्रमाणे कलाकारांसाठी वर्क फ्रॉम होम पद्धत तितकी सोपीही नव्हती. आणि आपल्या श्रोत्यांना, रसिकांना भेटल्याशिवाय फार काळ राहणं हे सच्चा कलाकाराला नेहमीच अवघड असतं. पण हार मानून गप्प बसतील ते कलाकार कसले! 'जुगाड' हा ज्यांचा अतिशय जीवाभावाचा आणि परवलीचा शब्द आहे असे अवलिया असतात कलाकार. यांनी लगेच प्रयोग करायला सुरुवात केली आणि सोशल मीडिया हा नवीन रंगमंच, स्वरमंच डेव्हलप झाला. याविषयी आणखी माहिती देतोय, सध्या अतिशय चांगल्या दर्जाचे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात अग्रेसर असणारा, आयोजक आणि तालवाद्यंवादक 'आदित्य बिवलकर.' तर वाचूया आदित्यशी टीम शुभसूरपीडियाची झालेली बातचीत.


१. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे इव्हेंट फिल्डवर नक्की काय परिणाम झाला?


लॉकडाऊन आणि कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका या इंडस्ट्रीला बसलाय, साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना हे कारण होऊन आपल्याकडे इव्हेंट्स बंद व्हायला लागले आणि त्यानंतर आजही हीच परिस्थिती आहे. पुन्हा हे सेक्टर सुरू कधी होईल याची कल्पना कोणालाच नाही. अनेक कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे यामुळे हाल झाले आहेत. बऱ्याच कलाकारांचे, आयोजकांचे आधी केलेल्या कामांचे पैसेसुद्धा या लॉकडाऊनमुळे थकीत आहेत. त्यातच केंद्र शासनाच्या मदतीच्या किंवा कोणत्याही पॅकेजमध्ये या सेक्टरचा विचार झालेला दिसत नाही.


२. फेसबुक, युट्यूब किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर लॉकडाऊन काळात वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा अनुभव कसा होता/आहे यामध्ये कलाकारांचा रिस्पॉन्स कसा होता, तसंच तांत्रिक बाबी आणि अडचणी काय आल्या?


लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक कलाकार आपण पुन्हा लोकांसमोर कधी येणार या विचाराने फेसबुक आणि अन्य माध्यमांवर यायला लागले. मात्र यामध्ये कोणतेही नियंत्रण नसल्याने त्याचा फटका कलाकारांनाच बसण्याची शक्यता आहे. रोजच्या रोज येणारे व्हिडियोज, भरमसाठ कंटेंट, याचा वेगळा परिणाम होण्याची शक्यता आहे. गरजेपेक्षा जास्त कंटेंट सोशल माध्यमांवर आज मोफत उपलब्ध आहे त्यामुळे भविष्यात पैसे देताना लोक विचार करतील. अनेक कलाकारांनी घाई केल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आणि गुणवत्तापूर्वक कंटेंट लोकांसमोर आला नाही. कुठेतरी व्हिडियो पोस्ट करताना तंत्रज्ञान, त्या व्हिडियोचा दर्जा, त्यातला कंटेंट या सगळ्या गोष्टींचा विचार करून फार थोड्या लोकांनी कंटेंट तयार केला. आपल्याकडे यातील तांत्रिक बाबी लोकांना आजही माहित नाहीत, शिवाय या तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी वेगळे तंत्रज्ञ असतात हेसुद्धा माहिती नाही त्यामुळे कोणत्यातरी xyz मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन फ्री व्हर्जनमध्ये व्हिडियो तयार करणं, ठराविक वेळ काळ याचा विचार न करता पोस्टिंग, त्यातील analytics चा विचार न करता फक्त घाईने लोकांसमोर जाण्याची स्पर्धा या काळात दिसून आली. या सगळ्यामध्ये कलाकारांचे स्वतःचे नुकसान आहे हा भाग लक्षात घेतला जात नाही. व्ह्यूजच्या मागे जाण्याची स्पर्धा यामध्ये दिसून आली. मी स्वतः या काळात पॉझिटिव्ह व्हाईब या अंतर्गत २१ विविध विषय घेऊन एक व्हिडियो सिरीज राबवली. यामध्ये प्री रेकॉर्ड केलेल्या कंटेंटचा वापर करण्यात आला होता त्यामध्ये व्हिडीओची क्वालिटी आणि वेळ याकडेसुद्धा लक्ष देण्यात आले होते. शिवाय फार मोठे व्हिडियो तयार न करता ३-४ मिनिटांची गाणी, कविता, अभिवाचन यांचा यामध्ये समावेश होता.


३. थिएटरमध्ये किंवा हॉलमध्ये जसे करतो तसे कार्यक्रम तिकीट लावून ऑनलाईन करण्याची संकल्पना कशी सुचली?


बऱ्याच संस्था किंवा फेसबुक पेजेसवर आणि स्वतः कलाकारांनी ऑनलाईन मैफली याच काळात सुरू केल्या. एक एक तास लाईव्ह रंगणाऱ्या बहुतांश मैफलीमध्ये प्रेक्षकांना गाणी ऐकायला तर मिळायची पण त्यामध्ये म्युझिकल इफेक्ट करेक्ट नव्हता, शिवाय साऊंड आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर नसल्याने या लाईव्हला म्युजिकल व्हॅल्यू खूप कमी होती. आणखी एक गोष्ट म्हणजे या मैफलींमधून कलाकारांना मानधन स्वरूपात रक्कम मिळायची नाही. लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे आपल्या कलेवर पोट असणाऱ्यांच्या दृष्टीने एक पर्याय यावा म्हणून ऑनलाईन कार्यक्रम तिकीट लावून करावा किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कलाकारांना मानधन मिळावे हा या कार्यक्रमाचा भाग होता. शिवाय लोकांनाही चांगले दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळावेत हा यातील दुसरा हेतू होता. अर्थात या माध्यमांची आर्थिक गणितं पूर्णपणे वेगळी आहेत मात्र तरीही एक पर्याय म्हणून आता याकडे बघितलं पाहिजे. लोकांना मोफत ऐकवून त्यांना ती सवय लावण्यापेक्षा त्यांच्याकडून माफक शुल्क घेऊन चांगल्या दर्जाचा कार्यक्रम सादर करावा हा या मागचा हेतू होता.


४. ऑनलाईन कार्यक्रम करताना तांत्रिक गोष्टी हाताळणं, कलाकारांचं कोऑर्डीनेशन या सगळ्याचा अनुभव कसा होता?


मी स्वतः जवळपास तीन महिने वेगवेगळ्या माध्यमांवर कार्यक्रम ऑब्झर्व्ह करून माझी सादर करण्याची पद्धत विकसित केली. अनेक माध्यमांवर पैसे घेऊनसुद्धा पूर्णपणे तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यक्रम रसिकांना मिळत नाहीत. याउलट फुल एचडी, अजिबात न अडकता, पूर्णपणे कार्यक्रमाच्या दर्जाला धक्का लागणार नाही असे जवळपास ७-८ कार्यक्रम आत्तापर्यंत मी सादर केले आहेत. यापुढेही या माध्यमाद्वारे कार्यक्रम सादर करायचे आहेत. त्याचबरोबर इतर कलाकारांना आणि संस्थांना तांत्रिक सहाय्यसुध्दा मी करत आहे. या माध्यमांवर सादरीकरण करताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, विद्युत पुरवठा याची गरज असते. हीच या माध्यमासमोरची आव्हानं आहेत. शिवाय रसिकांचा प्रतिसाद अजूनही काही प्रमाणात मर्यादित असला तरीही प्रेक्षक याकडे हळू हळू वळतील. आपल्याकडे लोकांना १००% या माध्यमाची जाणीव नाही मात्र लोक या माध्यमाकडे हळू हळू वळतील. त्याचबरोबर कलाकारांनीसुद्धा तंत्रज्ञानाच्या बाबतीत सजग होण्याची आवश्यकता आहे.


५. ऑनलाईन कार्यक्रमासाठी कलाकारांना किंवा आयोजकांना काय गाईडलाईन्स देशील?


ऑनलाईन कार्यक्रमासाठी तांत्रिक बाजू उत्तम असण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे त्या दृष्टीने उत्तम तंत्रज्ञ तुमच्यासोबत असला पाहिजे. याचबरोबर या कार्यक्रमाला वेळ मर्यादा आहे. प्रेक्षक तीन तास लाईव्ह कार्यक्रम घरबसल्या ऐकू शकत नाहीत त्याऐवजी एक ते दीड तासांचा कार्यक्रम ते ऐकू शकतात. ऑनलाईन कार्यक्रम सादर करताना तुमच्या कंटेंटची कॉलिटी, व्हिडियो कॉलिटी, त्याची प्रसिद्धी या सगळ्या गोष्टींचा विचार कलाकारांनी/आयोजकांनी करायला हवा.


कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे इव्हेंट्स फिल्ड पूर्वपदावर यायला अजून किती काळ लागेल सांगता येत नाहीये. पण यावर मात करून नवीन आयडियाज लढवत आणि नवनवीन तंत्रांचा अवलंब करत आदित्य सगळ्या कलाकारांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. तांत्रिक बाजू सांभाळायला तो असला की कलाकारांना खरंच किंचितही टेन्शन नसतं. ज्यांना आत्तापर्यंत असे दर्जेदार कार्यक्रम तंत्रज्ञानाअभावी साकारता आले नाहीयेत, त्यांना साहाय्य करायला आदित्य नक्कीच तत्पर आहे.


असेच अनेक उत्तमोत्तम प्रयोग यशस्वीपणे करण्यासाठी 'शुभसूरपीडिया'तर्फे आदित्यला खूप शुभेच्छा!


- टीम शुभसूरपीडिया


#lockdown #socialmedia #digitalplatforms #youtube #facebook #instagram #liveconcerts #onlinemusicalconcerts #newtechnology #liveonlineshows #facebooklive #instagramlive #eventindustry #entertainmentindustry #musicindustry #lockdownartists #lockdownevents #liveevents #organisers #organizers #artists

206 views0 comments
bottom of page