संगीतकार किंवा म्युझिक कंपोझर होण्यासाठीच्या बेसिक स्टेप्स
संगीतकार होण्याची इच्छा असणाऱ्या कलाकारांसाठी -
संगीतकार किंवा म्युझिक कंपोझर होण्यासाठीच्या बेसिक स्टेप्स -
इंट्रो -
चाली कशा सुचतात हा कॉमन प्रश्न आहे. खरंतर याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. पण जेव्हा जेव्हा हा प्रश्न येतो, तेव्हा मला स्वतःला माझा प्रवास आठवतो. आणि आज याच थोड्याशा वाटचालीच्या आधारे नवीन होतकरूंना मदत करायची इच्छा आहे आणि तोच प्रयत्न करतेय.
● सगळ्यात आधी हे शोधण्याचा प्रयत्न करा कि संगीतकार व्हायचं आहे म्हणजे नक्की कशामध्ये इंटरेस्ट आहे? बाकी कोणी हे फॉलो करतंय म्हणून नाही, तुम्हांला स्वतःला एखादी ट्यून निर्माण करण्यात इंटरेस्ट आहे, किंवा एखादं गाणं ऐकताना ते वरवर ऐकण्याच्या पलीकडे तुम्हांला त्या गाण्याच्या निर्मितीमध्ये, ते कसं तयार झालं असावं यात इंटरेस्ट असेल तर तुमच्यात नक्कीच एक संगीतकार होण्याची इच्छा आहे.
पण ही साधी सोपी आणि शिकून नक्की आत्मसात होईलच अशी गोष्ट अजिबात नाही. ही आवड थोडीफार तुमच्यात उपजत असावं लागतंच नक्की!
संगीतकार व्हायचं तर नक्की झालंय पण पुढे कसं जायचं, नक्की काय शिकायचं याबद्दल मला माहिती असलेल्या गोष्टी.
● सांगीतिक शिक्षण - शिक्षण नाही पण चाली सुचतात असे अनेक जण आहेत. पण माझ्या मते यात लक फॅक्टर जास्त आहे. आणि मोनोटोनी यायची शक्यतासुद्धा खूप जास्त आहे, किंवा ज्यावेळी एखादी इंटेन्स चाल लावायची वेळ येईल त्यावेळेस सगळं अडू शकतं! असं कोणी म्हणतं का की मी मेडिकल शिकलो नाही पण, ऑपरेशन करू शकतो. किंवा मी इंजिनियरिंग केलं नाहीये पण रस्ता बांधू शकतो, सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो! ज्याप्रमाणे, या फिल्ड्स मध्ये ट्रेनिंग अत्यावश्यक आहे, त्याचप्रमाणे म्युझिकमध्येही प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. भले डायरेक्ट गुरुकडे जाऊन असेल, ऑनलाईन असेल, स्वतःचं स्वतः बघून ऐकून असेल, कोणत्याही मार्गाने चालेल पण शिकणं महत्वाचं आहे.
● कोणत्या प्रकारचं शिक्षण -
१. चाल तयार करणं हा पूर्णपणे सूर आणि तालाशी निगडित विषय आहे. आणि म्हणूनच शास्त्रशुद्ध शिक्षण हे बेस तयार होण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. मग ते इंडियन, वेस्टर्न काहीही असो. शेवटी जगात कुठेही सूर १२ च आहेत त्यात काही कमी जास्त होणार नाही. सुरावटींची कॉम्बिनेशन्स कशी तयार होतात, त्यातून काय फील बाहेर येतो. तालाशी कसं खेळायचं, वेगवेगळ्या प्रकारची टाईम सिग्नेचर्स कशी वापरायची हे सगळं शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे.
२. काव्याचा अभ्यास महत्वाचा आहे. शब्दांचे उच्चार कसे होतात, शब्दांचे अर्थ कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये काय लागतात, त्यांचा परिणाम कसा साधला जातो, आणि या सगळ्याचा हवा तो फील कसा मिळवायचा हे जमण्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही. उत्तम काव्यवाचन. शब्दांचं व्याकरण. कवितांचं मीटर, काव्यातलं यमक, ओळींचा फ्लो, ओव्हरऑल काव्याची पर्सनॅलिटी या सगळ्या बाबींबद्दल डिटेलमध्ये माहिती करून घेतली तरच शब्दांना न्याय देता येईल!
भरून येतं ते आभाळ, निरभ्र असतं ते आकाश... एकाच गोष्टीचे दोन वेगळे शब्द पण पूर्णपणे वेगळ्या फीलचे!
३. कल्पनाशक्ती. ही सरावानेच साध्य होणारी गोष्ट आहे. शून्यातून निर्मिती. एखादं काव्य वाचून, फील जाणून घेऊन, त्याला चाल लावणं जमायला हवं. एखादी सिच्युएशन इमॅजिन करून सुरुवात करावी. यामध्ये कोणतीही गोष्ट व्हिज्युअलाईज करता यायला हवी. दोन्ही गोष्टींमध्ये शब्दांना किंवा सिच्युएशनला न्याय देणं आवश्यक हवं. कारण संगीतकार म्हणजे नुसतं चाल देणं नाही तर योग्य ठिकाणी योग्य ती चाल देणं.
टीव्ही म्यूट करून चाललेल्या सीनला बॅकग्राऊंड म्युझिक देणं, कार्टून फिल्म्स म्यूट करून म्युझिक द्यायचा प्रयत्न करणं हे सरावाचे उत्तम मार्ग आहेत.
● एखादं स्वरवाद्य किंवा गाणं हे बऱ्यापैकी उत्तमरित्या येणं आवश्यक आहे. जी धून डोक्यात घोळते, ती प्रत्यक्षात उतरवता यायला हवी. त्यामध्ये बदल करायचे तर ते करून बघता यायला हवेत. आणि त्यासाठी त्या वाद्यावर किंवा गाण्यावर तेवढं प्रभुत्व हवं.. आपल्या डोक्यात असलेली सुरावट जेव्हा प्रत्यक्षात उतरते तेव्हा, कधी कधी तेवढी छान नाही वाटत. त्यावेळेस त्यावर मात करण्याइतपत स्किलफुली सुरांशी खेळता आलं पाहिजे.. कारण शेवटी चाल तयार करणं म्हणजे सुरांना गोंजारत, प्रसंगी त्यांची मनधरणी करत आपल्याला हवा तसा फील त्या सुरांमधून मिळवणं!
● सुरुवात करण्यासाठी तुम्हांला आवडलेले, भावलेले शब्द घेऊन त्यांना चाल लावायचा प्रयत्न करा. ज्याचा पूर्ण अर्थ आणि त्यामागच्या भावना कळतील असे शब्द. तुमच्या ओळखीच्या कोणाचे शब्द असतील तर तुम्ही त्यांच्याशी डिस्कस सुद्धा करू शकता. समजावून घेऊ शकता की त्यांना नक्की काय अर्थ आणि कसा फील अपेक्षित आहे. तुम्हांला कळलेला अर्थ आणि फील पडताळून घेऊ शकता.
दुसरा महत्वाचा अभ्यास म्हणजे, शब्दविरहित ट्युन्स करायचा प्रयत्न करा. म्हणजे एखादी सिच्युएशन इमॅजिन करून. किंवा टीव्ही लावून, म्यूट करून, जो सीन चाललाय त्याला, युट्यूब वर व्हिडियोज लावून त्यांना काही बॅकग्राऊंड म्युझिक करायचा प्रयत्न करणं. कारण समोर शब्द असून कंपोझ करणं वेगळं,आणि शब्दांच्या शिवाय नुसत्या सुरावटीमधून एखादा भाव निर्माण करणं वेगळं. तितकंसं सोपं नाही हे.
जी गाणी, ज्या चाली कंपोझ कराल, त्या कोणालातरी ऐकवा. फॅमिली मेंबर्स, मित्र, संगीतक्षेत्रातले तुमच्या ओळखीचे पण कामाने, अनुभवाने सिनियर असलेले.. आणि त्यांच्याकडून फीडबॅक घ्या. यावरून तुम्हांला अंदाज येईल तुम्ही करत असलेल्या कामाचा.
शक्य तितक्या जास्त चाली करत राहा. त्यातूनच प्रॅक्टिस होईल. आणि छान ट्यून्स करता यायला लागतील. जास्तीत जास्त चांगलं काम ऐका. संपूर्ण जगातलं म्युझिक ऐका, वेगवेगळे म्युझिक प्रकार, genres ऐका. ऐकणं हा एक अतिशय महत्वाचा आणि मोलाचा रियाज आहे.
- टीम शुभसूरपीडिया