top of page

शुभसूर क्रिएशन्स स्टार्टअप स्टोरी


सदर स्टोरी ही स्मार्ट उद्योजक या उद्योगविषयक मासिकामध्ये पब्लिश झालेली आहे. स्मार्ट उद्योजकची वेबसाईट - www.udyojak.org

शुभसूर क्रिएशन्स - स्टार्टअप स्टोरी

मला लहानपणापासूनच बिझिनेस या शब्दाचं खूप अप्रूप होतं. बिझिनेस म्हणजे काहीतरी एकदम भारी प्रकार असतो आणि तो करणारा बिझीनेसमन म्हणजे जबरदस्त व्यक्ती असते, हे माझ्यासाठी पक्कं झालं होतं. पण संगीतात करिअर करायचं ध्येय निश्चित असल्याने कधी स्वतः बिझिनेस करायचा विचार मनात आला नाही. आपण बरं आणि आपलं कंपोझिंग बरं, असाच इरादा होता. मात्र माझ्या पहिल्याच अल्बमच्या निमित्ताने शुभसूर अस्तित्वात आणून मी नकळत बिझीनेसमध्ये उतरले होते! अल्बमची रीतसर प्रोसेस सुरु झाल्यावर हे लक्षात आलं आणि कुठेतरी फार बरं वाटलं. माझी पॅशन जपण्याचं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून शुभसूरकडे बघतानाच मी हा व्यवसाय म्हणूनही वाढवू शकते याची जाणीव झाली आणि लगेच शुभसूर क्रिएशन्सची नोंद माझी सोल प्रोप्रायटरी फर्म म्हणून केली. पहिल्या अल्बमच्या कामाच्या निमित्ताने शुभसूर क्रिएशन्सकडून मला रेकॉर्ड लेबल आणि अल्बम रिलीजच्या वेळेस इव्हेन्ट मॅनेज करण्याचा अनुभव मिळाला. खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. अल्बम करण्यासाठी म्हणून मी दोन वर्षं आधीपासून पैशाची जमवाजमव करत होते. ती पुंजी आणि आईबाबांनी केलेली मदत हे शुभसूरचं पहिलं भांडवल होतं. अल्बमच्या कामानंतर मात्र शुभसूर क्रिएशन्स ही एक म्युझिक प्रॉडक्शन कंपनी म्हणून डेव्हलप करायचं ठरवलं.

एकीकडे माझी स्वतंत्ररित्या म्युझिकची कामं चालू होतीच. कंपोझिंग, अरेंजमेंट, म्युझिक प्रोग्रामिंग, कॉन्सर्टस, इत्यादी. त्यातली शक्य होतील तेवढी सगळी शुभसूरच्या अंडर आणण्याचा प्रयत्न सुरु केला. आवश्यक डॉक्युमेंट्स तयार करून घेतली. आणि शुभसूरच्या सर्व्हिसेस डिझाईन करायला सुरुवात केली. म्युझिकमधल्या कोणत्या गोष्टी आपण बिझिनेस मध्ये आपली सर्व्हिस म्हणून ऑफर करू शकतो, हा विचार केला. एक प्रॉपर लिस्ट केली. म्युझिक अल्बम्स, सिंगल सॉंग्स, जिंगल्स, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, कॉर्पोरेट फिल्म्स, थीम सॉंग्स, नाटकं, एकांकिका यांसाठी बॅकग्राऊंड म्युझिक इत्यादी सर्व्हिसेस शुभसूरच्या ऑफरिंग लिस्टमध्ये होत्या. सर्व्हिस बेस्ड बिझिनेस असल्याने, आणि मी एकटीच काम करत असल्याने मला प्रॉडक्शन कॉस्ट अजिबातच येणार नव्हती. मला गरजेच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी स्वतः म्युझिकमध्ये असल्याने ऑलरेडी माझ्याजवळ होत्या. त्यामुळे तो खर्चही नव्हता. सोशल मीडिया साईट्सवर हळू हळू शुभसूरबद्दल पोस्ट करायला सुरुवात केली. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता, चौकशी होत होती. आणि अगदी छोटी छोटी, म्हणजे एखाद्या गाण्याचं एडिटिंग, एखादा छोटा ट्रॅक, कुठे एखादी कॉन्सर्ट अशी कामं मिळत होती. तरी प्रयत्न चालूच ठेवले. हळूहळू पहिल्या अल्बममध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे सीडीज विकल्या जाऊन थोडे थोडे परत येत होते. ते सगळे साठवून आणि माझ्या स्वतंत्र कामांमध्ये मिळालेल्यातले काही पैसे बाजूला ठेवून दुसऱ्या अल्बमची तयारी सुरु केली. आणि त्या प्रोसेसमध्ये शुभसूरला, म्युझिक फील्डमध्ये हळूहळू नाव मिळू लागलं. सर्व्हिसेस टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहचत होत्या, कामं मिळत होती. दोन टीव्ही सिरियल्ससाठी एपिसोड सॉंग्स, दोन टायटल सॉंग्स, एक प्रायोगिक रंगभूमीवर खूप यशस्वी नाटक, एक कमर्शिअल नाटक, दोन तीन जिंगल्स, अशी प्रेस्टीजीअस कामं मिळाली आणि खऱ्या अर्थाने शुभसूरला किकस्टार्ट मिळाली.

यादरम्यान माझं लग्न झालं आणि नंतर माझा नवरा पराग हासुद्धा त्याची नोकरी सांभाळून शुभसूर क्रिएशन्सच्या कामात मला मदत करायला लागला. पराग कमर्शिअल आर्टिस्ट आहे आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्समध्ये जॉब करतो. त्याच्या हटके आयडियाजनी शुभसूरला एका नवीन उंची दिली! परागचा मला खूप सपोर्ट असतो. तो स्वतः एक अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे, कवी आहे. त्यामुळे आपलं काम बेस्ट कसं व्हावं यासाठी मला त्याच्याकडून नेहमीच इन्स्पिरेशन मिळत असतं. परागच्या साथीने एक कलाकार म्हणून मी खूप डेव्हलप होतेय! माझ्या आईबाबांनी माझ्यातली कला ओळखली आणि ती जपायला मला पाठिंबा दिला. तसंच लग्नानंतरही माझ्या सासूसासऱ्यांकडून मला खूप छान सपोर्ट आहे. त्यांना माझं खूप कौतुक आहे. माझ्या सगळ्या प्रोग्रॅम्सना ते आवर्जून येतात नेहमी. घरच्यांनाही माझ्या फील्डची आवड असणं आणि त्यांनी मला सर्वार्थाने भक्कम पाठिंबा देणं यासारखी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कुठलीच नाही!

आता शुभसूर क्रिएशन्सला गरज होती अजून एक स्टेप वरच्या पायरीवर जाण्याची, अजून डेव्हलप होण्याची. आणि मला नुसतंच बक्कळ पैसे मिळवून यशस्वी नव्हतं व्हायचं. शुभसूरच्या नावावर असं काहीतरी काम असावं, की त्या कामामुळे बाकीच्यांपेक्षा युनिक आणि हटके काहीतरी अचीव्ह केल्याचं समाधान मिळावं अशी माझी नेहमीच इच्छा होती. अशी एखादी सर्व्हिस डिझाईन करण्याचा विचार सुरु केला. त्यात काहीतरी खास एलमेंट असायला हवं होतं. जे सामान्य लोकांपासून श्रीमंत उद्योजकांपर्यंत आणि कॉलेज गोअर्सपासून अगदी नव्वदीच्या आजीआजोबांपर्यंत कोणीही वापरू शकेल. आणि विचार करता करता गिफ्ट ही गोष्ट डोक्यात आली. गिफ्ट ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक जण कधी ना कधी, कोणा ना कोणाला देतोच! कधी ती वस्तू असते, कधी फुलं तर कधी ग्रीटिंग. पण स्वरूप काहीही असलं तरी एक गोष्ट निश्चित तेवढीच स्पेशल असते ती म्हणजे मनातली भावना! मग म्हटलं, हीच भावना आपण शब्दसुरांमध्ये गुंफली तर? याच विचाराने म्युझिकल मेसेंजरच्या संकल्पनेची सुरुवात झाली आणि ती पुढे जसजशी डेव्हलप होत गेली तसतशी एक वेगळीच म्युझिकल सर्व्हिस आकार घेऊ लागली. आपल्या शुभेच्छा आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवणारी म्हणजेच दूत आणि संगीतमय म्हणून म्युझिकल, असं "म्युझिकल मेसेंजर" हे नाव सुरुवातीपासूनच मनात घर करून गेलं!

म्युझिकल मेसेंजरला कुठल्याही विषयाचं बंधन नाही. वाढदिवस, सणसमारंभ, आनंदसोहळा, अगदी दिलगिरीसुद्धा, प्रत्येक भावनेला सुरांच्या कोंदणात गुंफता येतं! एखाद्या व्यक्तीला जर कोणासाठी म्युझिकल मेसेज करायचा असेल तर त्याने आम्हांला संपर्क करायचा. मग त्या व्यक्तीशी बोलून तिला मेसेजमध्ये काय म्हणायचंय ते जाणून घेतो. आणि त्याच भावना शब्दांत बांधून, त्यांना चाल लावून एक छानशी जिंगल तयार करतो. त्या जिंगलमध्ये एखादी जरी गोष्ट त्या व्यक्तीने स्वतः केलेली असेल, उदा. शब्द, चाल किंवा ते म्हणणं, तर या म्युझिकल मेसेंजरला एक वेगळाच आणि खूप स्पेशल असा पर्सनल टच येतो. आतापर्यंत केलेल्या म्युझिकल मेसेजेसनी इमोशनली खूपच धमाल उडवून दिलीय! आणि हा आनंद वाटून मिळणारं समाधान खूप छान आहे. शुभसूरसाठीही हा खूप मस्त अनुभव आहे. सध्या म्युझिकल मेसेंजरवर मी आणि माझा लाईफ पार्टनर पराग आम्ही मिळून काम करतोय. लोकांपर्यंत ही कॉन्सेप्ट पोहोचवणं, हेच सगळ्यात कठीण काम आहे. कारण ही संकल्पना एकदम नवीन असल्याने ती रुजायला थोडा वेळ लागेल. पण तो वेळ द्यायची, त्यासाठीची मेहनत घ्यायची तयारी शुभसूरने कधीच केलेली आहे! कोणत्याही बिझीनेससाठी महत्वाचं असतं ते म्हणजे भांडवल. आमच्या बाबतीत सर्व्हिस बेस्ड असल्याने आणि बरंचसं काम ऑनलाईन होत असल्याने प्रॉडक्ट्सच्या निर्मितीसाठी तशी पैशाची गरज नव्हती. पहिले दोन अल्बम्स वगळता. पण ती दोन्ही इनहाऊस प्रोजेक्ट्स होती. आणि त्याचे पैश्याव्यतिरिक्तही बरेच फायदे शुभसूरला मिळाले आहेत. त्यामुळे आमची क्रिएटिव्हिटी आणि वेळ हीच आमची मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. ज्या ज्या कामांमध्ये बाहेरची एखादी सर्व्हिस हायर करावी लागते उदा. रेकॉर्डिंग स्टुडियो, म्युझिशियन्स, इत्यादी, तिथे त्यानुसार टर्म्स क्लायंट्ससोबत डिस्कस केल्या जातात आणि ऍडव्हान्स घेतला जातो.

सध्या शुभसूरमध्ये एम्प्लॉयी असे काही नाहीयेत. म्युझिकचं बरंच काम ऑनलाईन होत असल्याने, रेकॉर्डिंगसाठी स्टुडियो, रिहर्सलसाठी रिहर्सल हॉल, मिटिंग्ससाठी कॅफेज किंवा क्लायंटचं ऑफिस असे पर्याय उपलब्ध असल्याने, शुभसूरला अजूनपर्यंत तशी स्वतःच्या ऑफिसची गरज भासली नाहीये. पण घरातल्याच एका रूमला अकॉस्टिक ट्रीटमेंट देऊन होम सेटअप तयार केला आहे. पोर्टेबल सेटअप, स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन, व्हिडियो कॉलिंग फॅसिलिटी, व्हॉट्सअप इत्यादीसारख्या टेक्नॉलॉजिचा वापर आम्ही करतो. यामध्ये वेळ आणि पैसे या दोन्ही गोष्टींची बऱ्याच प्रमाणात बचत होते. ते पैसे दुसरीकडे वापरता येतात. वेळ बिझिनेस ग्रोथ, स्वतःची डेव्हलपमेंट यासाठी सत्कारणी लावता येतो. अर्थात जेव्हा पसारा खूप वाढेल त्यावेळेस ऑफिस किंवा वेगळ्या वर्कप्लेसचा विचार निश्चितच करू आम्ही.

आवर्जून नमूद करावी अशी एक गोष्ट म्हणजे बिझीनेसला तो एक पार्टनर आहे असं गृहीत धरून प्रोफिटमधला त्याचा शेअर त्या त्या वेळेस राखीव ठेवून दिला तर तो पैसा बिझीनेसच्या ग्रोथसाठी आपल्याला वापरायला मिळतो. वेळोवेळी हा शेअर राखून योग्य वेळी तो योग्य तिथे इन्व्हेस्ट केल्याने डबल ट्रिपल फायदा आपल्यालाच होऊ शकतो हा माझा पर्सनल अनुभव आहे. या इन्व्हेस्टमेंटमधली एक महत्वाची गोष्ट जी बिझीनेसेससाठी खूप गरजेची असते, ती म्हणजे जाहिरात! आपल्या प्रॉफिटमधला थोडा हिस्सा आपल्याच बिझीनेसच्या जाहिरातीसाठी खर्च केला तर त्याबदल्यात आपल्याला जास्त नाव, जास्त क्लायंट्स आणि पर्यायाने जास्त बिझिनेस मिळू शकतो.

भविष्यात शुभसूर क्रिएशन्स एक स्ट्रॉंग, रेप्युटेड म्युझिक कंपनी म्हणून वाढवण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. टीम वाढवणं, स्वतःचं ऑफिस सुरु करणं, मार्केटिंगमध्ये स्मार्टली इन्व्हेस्ट करणं, शुभसूरच्या वेबसाईटवरून अजून काही इंटरेस्टिंग सर्व्हिसेस सुरु करणं, इत्यादी प्लॅन्स आहेत. मेहनत आणि स्मार्ट वर्कच्या जोरावर हे सगळे प्लॅन्स यशस्वी होतील अशी आशा करते आणि माझा लेख इथेच थांबवते!

- सुखदा भावे-दाबके फाऊंडर, शुभसूर क्रिएशन्स ९८१९२०४२३२ shubhasurcrearion@gmail.com


#shubhasur #creations #shubhasurcreations #startup #startupstory #business #creativeartbusiness #arts #music #lyrics

7 views0 comments
bottom of page