top of page

शुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास!

Updated: Aug 23, 2021


युट्यूबचा उपयोग व्हिडियोज बघायला खूप आधीपासून आपण सगळेच करतो तसाच मी ही करत होते.. त्यात म्युझिशियन असल्याने काहीही ऐकायचं असेल, एखादं गाणं, म्युझिक ट्रॅक की हाताशी लगेच युट्यूब असायचं आणि अजूनही असतंच! कारण युट्यूब हे गुगल नंतरचं टॉप नंबरचं सर्च इंजिन आहे.. प्रत्येक जण तिथे काही ना काही शोधायला येत असतो.


२००९ ते २०१३ मध्ये जनरल काही व्हिडियोज, म्हणजे अल्बमच्या मेकिंगचे वगैरे, सहज म्हणून माझ्या पर्सनल gmail id वरून युट्यूबवर टाकले होते.. त्यातल्या काहींना छान रिस्पॉन्स आला. मग २०१४ मध्ये गंमत म्हणून शुभसूर क्रिएशन्सच्या gmail आयडीवरून आमच्या एका नवीन गाण्याचा एक लिरीक व्हिडियो अपलोड करून शुभसूरच्या युट्यूब चॅनलला सुरुवात केली.. सुरुवातीला फारसं सिरियसली घेतलं नाही.. साधारण थोड्या थोड्या काळाने एखादं एखादं ओरिजिनल गाणं त्यावर अपलोड करत राहिले. नंतर मला कळलं की युट्यूबवर व्हिडियोज अपलोड करून पैसेही मिळवता येतात. शिवाय अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्यायोगे चॅनल ग्रो करता येतो. आणि युट्यूब हा एक साईड बिझिनेस म्हणून करता येतो.. काही युट्यूबर्स हेही आहेत ज्यांची रोजीरोटी युट्यूबवरच अवलंबून असते हे कळलं तेव्हा तर मी अवाकच झाले होते!


हळूहळू या सगळ्यातलं पोटेन्शियल लक्षात आलं आणि प्रत्येक कलाकाराचा युट्यूब चॅनल असलाच पाहिजे यावर ठाम विश्वास बसला! मग मात्र युट्यूबला थोडं सिरियसली घ्यायचं ठरवलं आणि महिन्याचे अपलोड्स वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. पण बाकी प्रोजेक्ट्समधून इतका वेळ मिळत नव्हता जास्त पण तरी जेव्हा थोडा वेळ फ्री असायचा युट्यूब चॅनलसाठी काम करायचे.. आणि अचानक चॅनलवरचा एक व्हिडियो पॉप्युलर व्हायला सुरुवात झाली! मग दुसरा, मग तिसरा असे काही व्हिडियोज सबस्क्राईबर्स, वॉचटाईम असं मिळवायला लागले. त्यावेळेला एक हजार सबस्क्राईबर्स आणि चार हजार तास वॉचटाईम हा क्रायटेरिया नव्हता पण मला माहीतच नव्हती प्रोसिजर चॅनल मॉनेटाईझ करायची.. एक दिवस अचानक ती कळली, अप्लाय केलं आणि एक दोन दिवसांत चॅनल मॉनेटाईझेशन ऑन झालंसुद्धा!


पण त्यानंतरही पहिला पेचेक येणं सोपं नव्हतं. सुरुवातीला महिन्याला हार्डली ३ किंवा ४ डॉलर्स मिळायचे.. आणि १००डॉलर्स पूर्ण झाल्याशिवाय ते पैसे आपल्याला मिळत नाहीत.. पण एका टीव्ही सिरीयलच्या मी लिहिलेल्या आणि कंपोझ केलेल्या गाण्याचा लिरीक व्हिडियो अपलोड केला आणि चॅनलची खऱ्या अर्थाने ग्रोथ सुरू झाली! पुढच्याच महिन्यात युट्युबकडून पहिलं पेमेंट आलं आणि मला प्रचंड सॉलिड काहीतरी मिळल्यासारखं वाटत होतं! या एका वेगळ्याच प्रवासातली पहिली अचिव्हमेंट होती ती!


त्यानंतर मी इंटरनेटवर सर्च करून युट्यूबबद्दल बऱ्याच गोष्टी शिकत गेले आणि त्या शुभसूरच्या चॅनलवर इम्प्लिमेंट करत गेले. हळूहळू चॅनलची ग्रोथ दिसत होती.. आणि अचानक कोविड१९ आला आणि जग ठप्प झालं. पण डिजिटल प्लॅटफॉर्म्स तेवढेच active राहिले किंबहुना जास्तच कंझ्युम व्हायला लागले. अर्थात युट्यूब यात नंबर एकला होतं! या काळात नव्याने युट्यूबवर बऱ्याच जणांनी एंटर केलं, युट्यूबवरचे व्हिडियोज बघणाऱ्यांची संख्याही अनेक पटींनी वाढली.. जे चॅनल्स छान इंटरेस्टिंग कंटेंट रेग्युलरली प्रोड्युस करत होते त्यांच्या व्ह्यूजमध्ये आणि सबस्क्राईबर्समध्ये कमालीची वाढ झाली.. या सगळ्यात शुभसूरलाही थोडाफार फायदा झालाच.. आणि थोडाथोडा का होईना पण रेग्युलरली एक रेव्हेन्यू यायला लागला! माझ्यासाठी फार भारी फीलिंग होतं हे..


एक अतिशय महत्त्वाची गोष्ट यात कळली ती म्हणजे जसं जॉबमध्ये आपल्याला रोजच्या रोज काम करावं लागतं, इनपुट्स द्यावे लागतात, तसंच युट्यूबर म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर सातत्याने काम करण्याला फार जास्त महत्व आहे! भले चॅनल नवीन असेल, फार सबस्क्राईबर्स नसतील, व्ह्यूज नसतील, पण तरीही एखादं व्रत घेतल्यासारखं हे माध्यम हाताळावं लागतं. प्रचंड मेहनत, वेळ, डेडिकेशन हे सगळं द्यायची तयारी असेल तरच युट्यूबकडे सिरियसली बघावं.. अन्यथा क्वचित महिन्यातून एखादा व्हिडियो अपलोड करून त्यातून यशाची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्यूब आता केवळ मनोरंजनाचं साधन उरलेलं नाही. एक व्यवसाय म्हणून युट्यूबवर प्रचंड पोटेनशियल आहे, आणि हे ओळखून त्या दृष्टीने पावलं उचलली, तर अजूनही वेळ गेलेली नाही.. आत्ता २०२१ सुरू होतंय, २०२५ पर्यंत युट्यूबवर येणारा व्ह्यूअर आणि कंटेंट क्रिएटर हे दोन्ही आकडे कमालीचे वाढणार यात शंका नाही!


एक कलाकार म्हणून माझ्या इतर कलाकार मित्रांना आणि ज्यांना नव्याने युट्यूबवर यायची इच्छा आहे, त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, की युट्यूबसंदर्भातल्या शक्य तितक्या गोष्टी स्वतः शिका, मुद्दाम वेळ काढून युट्यूबवर व्हिडियोज अपलोड करा.. लगेच यश मिळणार नाही, गोष्टी चुकतील, पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवा. सातत्याने व्हिडियोज अपलोड करणाऱ्याला युट्यूब अल्गोरिद्म्स त्यांच्या मेहनतीचं फळ नक्की देतात!16 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page