top of page

तो... ती... आणि कोकणकन्या...!!


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ती उभी होती.. खांद्याला एक सॅक, एका हातात ट्रॉलीबॅग, दुसऱ्या हातात पाण्याची बॉटल.. ट्रेनची वेळ जवळ आली आणि ती थोडी रेस्टलेस झाली.. तशी ती काही पहिल्यांदा प्रवास करत नव्हती, ऑफिस टूर्सच्या निमित्ताने अनेकदा फिरली होती.. तेवढ्यात गलका झाला, आजूबाजूला धावपळ झाली थोडीशी..


कोकणकन्या आली होती.. अगदी कन्फर्म तिकीट हातात असलं तरी गाडी येऊन आपली सीट मिळेपर्यंत माणूस किंचित कॉन्शियस होतोच! तिचंही तसंच झालं होतं.. पण बऱ्यापैकी सराईतपणे तिने तिची सीट मिळवली. साईड बर्थ, विंडो सीट.. सॉर्टेड!


घरातून निघताना तशी वैतागलेलीच होती पण निदान स्टेशनपर्यंतच्या दीड तासाच्या टॅक्सी प्रवासात तिची आवडती गाणी नुकत्याच नवीन घेतलेल्या जबराट हेडफोन्सवर ऐकायला मिळाल्याने मूड जरा बरा झाला..


ट्रॉलीबॅग adjust करून ठेवली, तिकीट रेडी ठेवलं चेकरला दाखवण्यासाठी, पाण्याची बॉटल सीटजवळच्या बकलमध्ये इन्सर्ट केली, जॅकेट बाहेर काढून ठेवलं, सगळं प्रॉपर ऑर्गनाईज्ड!


ती सेटल होऊन साधारण दहा-पंधरा मिनिटं झाली होती.. एसी बोगी असल्याने बाहेरच्या आवाजाचा प्रश्न, किंवा घुसखोरी वगैरे नव्हती.. आता थोडा वेळ साईड लॅम्पमध्ये तिचं आवडतं फिक्शन वाचायचं आणि वेळेत गुडूप होऊन जायचं असा विचार..


वाचता वाचता अचानक तिच्या पुस्तकाला कोणाचातरी धक्का लागला आणि ते खाली पडलं.. फार वैतागली.. एकतर अतिशय इंटरेस्टिंग मोडवर होती स्टोरी.. जरी तिने अनेकदा वाचली असेल तरी या मोडवर डिस्टर्बन्स तिला नको असायचा..

"सॉरी सॉरी, चुकून लागला धक्का.." मवाळ गिल्टी आवाज. ती फणकारली, "बघून चालता येत नाही का, एक तर उशिरा यायचं वर दुसऱ्यांना त्रास द्यायचा..!!" त्याने सॉरी सॉरी म्हणत आपली सीट पाहिली, हायहुश करत टेकला.. त्याचं बुकिंग तिच्या आधीच्याच नंबरला होतं.. म्हणजे समोरची सीट..

"निघायला उशीर झाला, त्यामुळे पलिकडच्या बोगीला चढलो.. आणि मग इथपर्यंत..." "विचारलंय..??" तिने मध्येच तोडलं त्याचं वाक्य.. पुढे काही बोलला नाही.. खाली बघत राहिला नुसता.. आजूबाजूचे लोक इंटरेस्टेड होतेच बोलणं ऐकण्यात पण विषय न वाढल्याने बिचाऱ्यांचा अगदीच हिरमोड झाला..


थोडावेळ पुस्तक वाचून मिटलं आणि ती झोपायच्या तयारीला लागली. उशिराची वेळ आणि ऑड सिझन असल्याने तशी फार वर्दळ नव्हती बोगीमध्ये. पाणी पिता पिता तिची नजर गेली सहज तर तो तिच्याकडेच बघत होता..!! फणकाऱ्याने तिने त्याच्यावरची नजर काढून घेतली.. तरी तो आपला एकटक बघतोच आहे.. ती सरळ उभी राहिली आणि जरबयुक्त नजरेने त्याच्याकडे बघत राहिली.. तिला झोपायचं आहे हे ओळखून तो सरळ वरच्या बर्थला चढला आणि बसून राहिला.. आडवी होऊन तिने लाईट ऑफ केला, एकदा डोकं साईडला करून वर बघितलं आणि शाल डोक्यावर ओढून घेतली.


आजूबाजूचे प्रवासी पण झोपायच्या तयारीतच होते.. पलीकडे कॉलेजचा एक ग्रूप पत्ते खेळत बसलेला.. त्यांचा आवाज चालला होता बराच, पण एका आजोबांनी आवाज न करण्याबद्दल सौम्य शब्दांत सांगितलं तशी ती मुलंही शांततेत खेळायला लागली.. मध्येच कोणीतरी वॉशरूमला जात होतं तेवढीच काय ती जा-ये.. नाहीतर सगळीकडे आता सामसूम व्हायला लागलेली..


तिला जरा झोप लागत्ये तेवढ्यात वर त्याचा मोबाईल वाजला मोठ्याने. सायलेंट करायला विसरला असावा. पुन्हा वैतागली त्याच्यावर.. काहीतरी बोलणार तोपर्यंत त्याने फोन उचलला होता.. "बोल सुन्या, कसा आहेस? हो हो माहितीय उद्याची मिटिंग, पण अरे मी रत्नागिरीला चाललोय.. घरचं काम आहे थोडं.. हो ट्रेनमध्येच आहे आत्ता.." बऱ्यापैकी मोठ्याने बोलत होता.. पण तेवढ्यात नेटवर्क गेल्याने त्याचा कॉल ड्रॉप झाला.. त्याने कॉलबॅक ट्राय केला पण नेटवर्क पार गेलेलं.. तिने पुन्हा शालीत डोकं खुपसून झोप कन्टीन्यू केली..


तो हळूच खाली उतरला आणि तिच्याकडे बघत बघत बाहेरच्या पॅसेजला जाऊन उभा राहिला.. बराच वेळ तिथेच उभा होता.. स्टेशन्स जात होती, स्टॉप होता तिथे गाडी थांबत होती, क्वचित एखादा कोणी चढ-उतार करत होता.. ऑब्झर्व करत होता तो.. नंतर मग पाय दुखायला लागले म्हणून पुन्हा येऊन त्याच्या बर्थवर जाऊन आडवा झाला.. कधीतरी झोप लागली त्याला..


शार्प साडेपाचला तिच्या मोबाईलचा अलार्म वाजला.. अक्षरशः जागी असल्याप्रमाणे पहिल्या रिंगला अलार्म ऑफ केला तिने..! रोजची सवय होती तिची.. दुसरी रिंग व्हायची नाही कधी.. रत्नागिरीचं ६ चं टायमिंग होतं म्हणून अर्धा तास आधीचा अलार्म तिचा.. गाडी एकदम राईट टाईम होती.. ती उठून ब्रश वगैरे करून आली.. वरच्या बर्थवर बघितलं तर तो प्रचंड गाढ झोपलेला होता..

आजूबाजूला रत्नागिरीला उतरणाऱ्यांची आवराआवर चालली होती.. त्यातल्याच एकाला तिने म्हटलं, "दादा जरा त्यांना हाक माराल का? रत्नागिरीला उतरायचंय त्यांना." त्या माणसाने 'अरे हो काल फोनवर बोलताना ऐकलं होतं मी पण' म्हणत त्याला हलवला.. गडबडत उठून त्या माणसाला थॅंक्यु थॅंक्यु म्हणत हा खाली आला.. बेसिक आवरून होतंय तोच रत्नागिरी स्टेशनला पोचत आली गाडी.. घाईघाईने याने सॅक उचलली पॅसेजमध्ये पोचला.. ती बऱ्यापैकी पुढे होती.. मध्ये दोन-चार माणसं, मागे हा.. थांबली गाडी..


ती ट्रॉलीबॅग खेचत स्टेशनची एक्झिट गाठणार इतक्यात मागून हाक आली, "मॅडम, ओ मॅडम, थांबा ना प्लीज..!!" मागे वळून पाहिलं, धापा टाकत येत होता तो.. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा चीड, पण तिला काही बोलू न देता तो बोलायला लागला, "आय अ‍ॅम सो सॉरी सोना, प्लीज आता राग सोड ना.. मला माहितीय मी नेहमीसारखा यावेळेलाही ट्रिप कॅन्सल करणार होतो.. ऑफिसच्या कामामुळे.. पण या वेळचा तुझा राग काहीतरी वेगळाच होता.. अँड यू केप्ट युअर वर्ड.. चक्क निघून आलीस स्टेशनला बॅग घेऊन.. तुझा मेसेज पाहिला, लोकेशन पाहिलं आणि तडक निघालो ऑफिसमधून तसाच.. काहीही सामान वगैरे न घेता.. ही बघ ऑफिसची सॅक घेऊन आलोय फक्त!" भडाभडा बोलत होता.. "खरंच सॉरी गं.. पण तुला माहितीय ना मी किती वर्कोहोलिक आहे.. आणि आता या प्रमोशनमुळे माझ्यावरचं वर्कलोड खूप वाढलंय" त्याला थांबवला तिने, "मिस्टर हजबंड! जॉब मी पण करते, चांगल्या पोस्टवर मी पण आहे.. पण अरे तू कितीवेळा बुकिंग कॅन्सल केलंयस आपलं तुझ्या कामामुळे.. आई कधीच्या भेटायला बोलवतायत आपल्याला.. दोन दिवस या रे पोरांनो म्हणून.. आणि एकदाही जाता येऊ नये आपल्याला? आत्तापर्यंत ५-६ वेळेला कॅन्सल केलं आपण.. त्यांना सांगायचं आम्ही येतोय, आईबाबा तिकडे वाट बघणार मग कॅन्सल करायचं. चुकीचं आहे हे.."

"अगं पण यावेळेस आपण त्यांना सांगितलंय कुठे? तसंही सरप्राईज देणार होतो आपण.."

"हाऊ कॅन यू इव्हन से धिस? अरे त्यांच्या अ‍ॅनिवर्सरी निमित्त सरप्राईज विझिट देणार आहोत ना आपण तिकडे? आणि ती कॅन्सल करून आपण त्यांचं एवढं महत्वाचं सेलिब्रेशन मिस करणार होतो? धिस इज नॉट डन यार.. एवढा वेळ तर काढायलाच हवा.. म्हणूनच कालही तुझा फोन आला कॅन्सल करूयाचा तेव्हा मी ठरवलं, यावेळेस नाही. तू आलास तर ठिक नाहीतर मी जाणार!" तो अगदीच कसनुसा होऊन बघत राहिला..

"तुझ्या वाढत्या रिस्पॉन्सिबिलिटीज मी समजू शकते डियर.. आय कम्प्लिटली रिस्पेक्ट दॅट.. पण लाईफमधले हे छोटे छोटे आनंद मिस करायचे नसतात! त्या पुंजीवरच आपण मोठ्या भराऱ्या मारायला प्रिपेअर होणार असतो!" सॉरी म्हणत त्याने अक्षरशः गुडघे टेकायचे बाकी ठेवले होते.. मग मात्र त्याचा चेहरा बघून तिचा राग मावळला! बहुतेक जेवलेलाही नव्हता तो.. तिच्या सॅकमधून टप्परवेअरचा टिफिनबॉक्स काढत तिने त्यातला मेथीपरोठ्याचा रोल त्याच्या हातात दिला, आणि त्याच्या दंडाला धरून एक्झिटकडे चालायला लागली!


© सुखदा

359 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page