व्हायरल : एका दिवसात ३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज!
प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपण केलेलं काम इंटरनेटवर व्हायरल होण्याचं! पण व्हायरल जाणं हे तितकंसं सोपं नसतं.. आणि आपलं कोणतं काम कधी कसं व्हायरल होईल हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही!

माझंही हे स्वप्नं होतं की मी केलेलं एखादं क्रिएशन युट्यूबवर व्हायरल व्हावं, खूप जणांनी ते बघावं! डोंबिवलीत संपन्न झालेल्या शताब्दी राष्ट्रगीताची या सोहळ्याच्या निमित्ताने रीअरेंज केलेलं संपूर्ण जनगणमन किंवा तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधलं ओढ ही लागली, यांचे व्हिडियोज लाखो लोकांनी बघितले तेव्हा फार आनंद झाला होता. ते व्हिडियोज ओव्हर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम व्हायरल झाले होते. पण हरितालिकेची एक पारंपारिक आरती केल्यानंतर, व्हिडियो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो, याचा खरा अर्थ समजला!
गेल्या वर्षीच्या म्हणजे २०१९ सालच्या ऑगस्ट महिन्यात, गणपती यायच्या आठवडाभर आधी आई मला म्हणाली की, 'आम्ही लहानपणापासून हरितालिकेची एक वेगळी आरती म्हणतो.. माझ्या काकूने शिकवली होती.. तुला दाखवू का म्हणून?' मी म्हटलं हो चालेल ना लगेच दाखव.. आईने मला थोडीशी गुणगुणून दाखवली.. आणि फारच इंटरेस्टिंग वाटली ती चाल, ते शब्द एकूणच सगळा फील! पण सगळे शब्द पाठ नव्हते आईचे. मग माझ्या आजीच्या आणि काकूआजीच्या मदतीने सगळे शब्द मिळाले, चाल मिळाली. आणि आरतीचा ट्रॅक तयार करून माझ्या आवाजात तो रेकॉर्ड केला. एकदम बेसिक आणि मिनीमल अरेंजमेंट ठेवली होती म्हणजे आरतीचा फील कुठेही कमी होणार नाही. कारण मुख्यत्वे शब्द आणि चाल लोकांपर्यंत नीट पोचणं महत्वाचं होतं. त्यानंतर व्हिडियो करायचं ठरलं. हरितालिकेच्या पूजेचा बेसिक सेट मांडायचं ठरलं. आईने पूजेची छान तयारी केली सगळी. बहिणीने कॅमेरा हँडल केला. आणि एडिट वगैरे होऊन सिम्पल व्हिडियो तयार झाला. आरती करायची ठरल्यापासून ४ दिवसांत आमच्या हातात रेडी व्हिडियो होता. तिसऱ्या दिवशी हरितालिकेचा दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडियो पब्लिश केला. मीनव्हाईल नेटवर मी सर्च केलं तर हरितालिकेची ही आरती दुसऱ्या कोणत्याच वेबसाईट किंवा चॅनलवर नव्हती. म्हणजे शुभसूरच्या चॅनलवरच ती पहिल्यांदा येणार होती.
सुरुवातीला मोजके व्ह्यूज मिळाले. पण हरितालिकेचा दिवस आला आणि जादू झाल्यासारखे व्ह्यूज वाढायला लागले! सकाळी लवकर पाहिलं तर अपेक्षेपेक्षा जास्त व्ह्यूज झाले होते आणि नंतर दुपारपर्यंत दर दहा मिनिटांना हजार - दोन हजार व्ह्यूज! आणि त्या एका दिवसात व्हिडियोला जवळपास दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. शुभसूर क्रिएशन्सच्या युट्यूब चॅनलवर असं पहिल्यांदाच घडलं होतं! आणि हरितालिका आरतीच्या व्हिडियोला दोन लाखांहून जास्त व्ह्यूज झाले होते!
त्यानंतर वर्षभर थोडे थोडे करत व्ह्यूज वाढत राहिले. वर्षभरात अजून २२-२५ हजार व्ह्यूज झाले. आणि २०२० साली हरितालिका होत्या त्याच्या साधारण २ दिवस आधी पुन्हा व्ह्यूज वाढायला सुरुवात झाली. २ दिवसांत साधारण ५०-६० हजार व्ह्यूज झाले आणि हरितालिकेच्या दिवशी एका दिवसात व्हिडियोला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले! यावेळेला तर स्नोबॉल इफेक्ट डबल होता गेल्या वर्षीपेक्षा! आणि फक्त भारतच नाही तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमधूनही व्ह्यूज मिळाले होते! लाईक्स येत होते, लोकांच्या खूप छान छान कमेंट्स येत होत्या! कधीच न ऐकलेली, साधा फील असलेली, ही आरती लोकांना खूप आवडत होती. एव्हाना ६ लाखांचा आकडा पार झाला होता आणि मला प्रचंड समाधान मिळत होतं आणि आनंद होत होता!
हरितालिका आरतीची युट्यूब लिंक -
ही पोस्ट लिहायला तसा उशीर झालाय, पण हा प्रवास शेअर करायचाच होता मला. एखादी रेअर पण खूप छान कलाकृती प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने सादर केल्यावर, विशेषतः जेव्हा ती धार्मिक किंवा सांस्कृतिक गोष्टींशी निगडित असते, आणि असा छान ओव्हरव्हेलमिंग रिस्पॉन्स मिळतो तेव्हा अजून असं छान काम करायला कित्येक पटींनी जास्त मोटिव्हेशन मिळतं! अशा छान कलाकृती हातून घडत राहोत आणि त्या लोकप्रिय होत राहोत हीच माँ सरस्वतीचरणी प्रार्थना!
© सुखदा भावे-दाबके
#viralvideo #YouTube #YouTubevideo #Haritalika_Aarti #haritalikaaarti #devotional #ShubhaSurCreations #YouTubechannel #SukhadaBhaveDabke